अमरावती : वामनदादांची गीतरचना अभ्यासली तर बाबासाहेबांची चळवळ, वामनदादांची गीते आणि गझलरचना यांचे संमीलन झाले आहे असे दिसते. यालाच इंग्रजीत ‘फ्युजन’ असे म्हणतात. बाबासाहेबांच्या चळवळीत ऊर्जा आणि क्रांती यांचे संमीलन झाले होते. तसेच बाबासाहेबांची चळवळ आणि वामनदादांची गीत-गझलरचना यांचे संमीलन झाले आहे. आंबेडकरवादावर अधिष्ठित काव्यलेखन करणारे आणि १९३८ पासून गझललेखन करणारे वामनदादा हेच आंबेडकरी गझलेचे आरंभबिंदू असल्याचे प्रतिपादन प्रमोद वाळके यांनी रविवारी येथे केले.
अमरावती येथे आयोजित अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या आंबेडकरी गझल संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे उद्घाटक डॉ. इकबाल मिन्ने, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, प्रमुख अतिथी अशोक बुरबुरे, डॉ. सीमा मेश्राम, नंदकिशोर दामोदर आणि महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे उपस्थित होते.
पुढे बोलताना वाळके म्हणले की, भारतात धार्मिक जीवनाची पुनर्स्थापना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अंगांनी ते प्रयोगही करीत आहेत. या प्रयोगावर मात करण्यासाठी जसे आंबेडकरी कविता, आंबेडकरी वैचारिक लेख प्रयत्न करीत असतात तसे किंबहुना त्याहून अधिक धैर्यशील प्रयत्न आंबेडकरी गझल करीत आहे. वामनदादांच्या प्रत्येकच गीत-गझलेमध्ये आंबेडकरवादाची सर्वकल्याणकारी भूमिका दिसून येते. त्यामुळेच वामनदादांनी लिहिलेल्या गझलांना आंबेडकरवादी गझल असे मी नाव दिले आहे. ज्या गझलांमधून सर्वकल्याणाचा, शोषणमुक्तीचा विचार येत नाही ती आंबेडकरी गझल होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.
संमेलनाचे उदघाटक डॉ. इकबाल मिन्ने म्हणाले, आंबेडकरवादाच्या विचारप्रवाहाने जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, देश, प्रदेश, भाषा यांच्या पलीकडे जाऊन, या साऱ्या मर्यादा ओलांडून मानवाला त्याच्या दुःखापासून मुक्ती देण्याची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे माणसाला दुःख आणि वेदनामुक्त करण्यासाठी आंबेडकरवाद हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.
यावेळी अशोक बुरबुरे, आशा थोरात, महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. सीमा मेश्राम यांनीसुद्धा समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक रोशन गजभिये, संचालन विजय वानखेडे यांनी केले तर आभार राजेश गरुड यांनी मानले.