‘मंकी गार्ड’ लागणार कधी ? : खातेदारांची प्रचंड कोंडीनांदगाव खंडेश्वर : तालुक्यांतर्गत येत धामक येथील स्टेट बँक परिसरात माकडांनी प्रचंड धुमाकूळ घातला. मंकी गार्डअभावी स्टेट बँकेवर जणू ‘वानरराज’ निर्माण झाले असावे. त्यामुळे बँकेच्या व्यवहारातही अडचणी येत आहेत. खातेदारांचीही प्रचंड कोंडी होत आहे. मात्र स्टेट बँकेवर मंकी गार्ड का लागत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. धामक स्टेट बँकेशी परिसरातील १० ते १२ गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या परिसरातील धामक, बेलोरा, येवती, धानोरा शिक्रा, सुलतानपूर, खरबी, वाघोडा इत्यादी गावांतील शेतकरी तसेच व्यापारी, कर्मचारी इत्यादींचे व्यवहार या बँकेशी निगडित आहेत. स्टेट बँक परिसरात अनेक मोठमोठी झाडे असल्याने या ठिकाणी नेहमीच माकडांचा वावर असतो. कनेक्टिव्हिटीसाठी स्टेट बँकेवर जी छत्री लावली आहे, त्या छत्रीवर माकडं उड्या मारत असल्याने नेहमीच स्टेट बँकेची कनेक्टिव्हिटी बंद असते. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबतात. अनेकदा नागरिकांना बँकेतून चार ते पाच दिवस पैसे मिळत नाही. आधीच नोटबंदीमुळे नागरिकांना पैसे काढताना अडचणी जात आहेत. त्यामध्ये माकडांच्या या हैदोसापायी जर आठवडाभर बँकेतून पैसे मिळाले नाही तर आर्थिक व्यवहार कसे होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकरिता स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांनी ‘मंकी गार्ड’ बसवून खातेदारांची सतत होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी धामक परिसरातील नागरिकांच्यावतीने होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
धामक स्टेट बँकेवर ‘वानरराज’
By admin | Published: January 31, 2017 12:21 AM