हजारो टन लाकूड बेवारस : उपवनसंरक्षकांकडून कागदपत्रांची तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : स्थानिक विलासनगरात रस्त्यालगत हजारो टन लाकूड बेवारस पडून असल्याची गोपनीय माहिती उपवनसंरक्षकांना मिळाली. माहितीच्या आधारे वनविभागाच्या विविध चमुंना सोबत घेऊन डीएफओंनी रविवारी सायंकाळी साडेचार वाजता येथील आरागिरण्यांवर धाडसत्र राबवून बेवारस लाकडांची मोजदाद चालविली. याधाडसत्राने आरागिरणी संचालकांची भंबेरी उडाली आहे. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या नेतृत्वात वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर, रेस्क्यू आॅपरेशन चमुचे आरएफओ एस.बी. वासगे, एम.व्ही.धंदर आदींनी आरागिरण्यांवर धाडसत्र राबविले. स्थानिक विलासनगरात अशोक सॉ मिल, जगदंबा, सत्यदेव आणि विश्वकर्मा अशा चार आरागिरण्यांना परवानगी आहे. मात्र, रस्त्यालगत स्मशानभूमिच्या भिंतीलगत हजारो टन बाभुळ प्रजातीचे लाकूड बेवारस कसे ठेवण्यात आले, हासवाल धाडसत्रानंतर डीएफओ मीणा यांनी आरागिरणी संचालकांसमोर उपस्थित केला असता ते निरूत्तर झाले. होते. इतकेच नव्हे तर लाकडाचे कागदपत्रेही उपवनसंरक्षकांना सादर करु शकले नाहीत. आरागिरण्यांविरुद्ध वनगुन्हे जारी ४स्थानिक विलासनगरात बेवारस लाकूड आढळल्याप्रकरणी अशोक, जगदंबा, सत्यदेव आणि विश्वकर्मा याचारही आरागिरणी मालकांविरुद्ध आरागिरणी परवाना अटी नियम भाग क्र. ४ व ५ ‘अ’ मधील नियमांच्या शर्ती व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी वनगुन्हे जारी केल्याची माहिती वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी दिली. गोपनीय माहितीच्या आधारे लाकूड बेवारस ठेवता येत नाही. याअनुषंगाने आरागिरण्यांचे परवाने तपासले जात आहेत. प्रथमदर्शनी वननियमांचा भंग झाला असून त्यानुसार कारवाई होईल. - हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती
विलासनगरात चार आरागिरण्यांवर धाडसत्र
By admin | Published: May 22, 2017 12:21 AM