अमरावती : नांदगावपेठ एमआयडीसीस्थित एका कंपनीत अविवाहित महिलांना जॉब देत नाही याबदल युवा स्वाभिमानी पार्टीकडे तक्रारी प्राप्त झाल्या. यासंदर्भात जाब विचारण्याकरिता युवा स्वाभिमानी पार्टीचे पदाधिकारी सोमवारी कंपनीत पोहचले. येथे व्यवस्थापकाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी येथील कपाटाच्या काचा फोडल्या. काहींनी खुर्ची तोडली. या ठिकाणी व्यवस्थापकांसोबत बाचाबाची करून त्यांना चांगलाच चोप दिला. यासंदर्भाचा एक व्हिडीओदेखील पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केला आहे.
अविवाहित महिलांना जाॅब देत नाही, हा प्रकार कामगार हक्कानुसार कोणत्या कलमानुसार सदर नियम आपल्या कंपनीत लागू करण्यात आला? हे आम्हाला लिखित स्वरूपात कळवावे, असा जाब शहर अध्यक्ष नीलेश भेंडे यांनी विचारला. परंतु व्यवस्थापक समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने कार्यकर्ते संतापले व त्यांनी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर नांदगावपेठ पोलिसांत तक्रार नोंदविली नव्हती. दोन दिवसांत हा प्रकार बंद न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा दम यावेळी पदाधिकाऱ्यांनी भरला.