तपास थंडबस्त्यात : चोरट्यांची टोळी सक्रियवरुड तालुक्यातील बेनोडा, जरुड परिसरात शेतातील मोटरपंपाच्या वायरच्या चोऱ्या मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. याबाबत तक्रारी देऊन चोऱ्या सतत वाढतच आहे. भुरट्या चोरांची टोळी सक्रिय झाल्याची चर्चा असून शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. शेंदूरजनाघाट, सावंगी, टेंभूरखेडा, लोणी, हातुर्णा, नांदगाव, बारगाव, बनोडा, आमनेर, वरुड, जरुड, मांगरुळी, करजगाव, जामगाव, गोरगाव, बारगाव, नागझिरी, राजुराबाजार, पुसला, टेंभूरखेडा, गव्हाणकुंडसह आदी परिसरात वायर चोरट्यांनी हैदोस घातला आहे. इतरही परिसरामध्ये कृषिपंपाच्या वायरच्या चोऱ्या वाढल्या आहेत. तालुक्यात सुरू असलेल्या विद्युत भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे रात्रंदिवस ओलीतासाठी शेतात जावे लागत आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असताना भुरट्या चोरांनी हैदोस घातला आहे. परिसरात ओलिताखाली शेतजमीन मोठ्या प्रमाणात आहे. ओलितासाठी शेतकऱ्यांना भारनियमनानंतर शेतात जावे लागते. परंतु नेमकी संधी साधून भुरटे चोर शेतातील मोटारपंपाच्या वायरची चोरी करीत आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून वीज आल्यांनतर तुटलेल्या वायरमुळे प्रसंगी अपघात घडण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चोरट्यांनी शेतकऱ्यांना वायर चोरीमुळे जेरीस आणले असून अनेकांचे कृषिपंप बंद पडत आहेत. दुसरीकडे ओलिताचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी याबाबत गंभीरतेने लक्ष देऊन चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. परंतु अद्याप शेती साहित्य चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. (तालुका प्रतिनिधी)
वरुडात कृषिपंपाच्या वायर चोरीचे सत्र सुरू
By admin | Published: November 01, 2015 12:28 AM