अमरावती : अमरावती येथून मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य विकलांग बालगृहातील कन्या ‘बसंती ऊर्फ पायल’ हिचा शुभविवाह अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील प्रतिष्ठित कुटुंबातील बसंत नारायणदास अग्रवाल या अपंग युवकाशी २६ एप्रिल रोजी होणार आहे.या बालगृहातील ही १६ वी कन्या आहे. बसंती ही वयाच्या ५ व्या वर्षी नाशिक येथील कुंभमेळ्यात आपल्या आई-बाबांसोबत आली होती. आई कँसरग्रस्त असताना तिची प्राणज्योत मालवली. तिच्याजवळ पोलिसांना थैलीमध्ये आईची चिठ्ठी आढळली. त्यामध्ये या मुलीचे पालन पोषण करुन तिचा राजस्थानी पद्धतीने विवाह करावा, असे लिहिले होते. सोबत ५ हजारांची रक्कम आणि श्रीकृष्ण भगवानाचे लॉकेट होते. ती आता २५ वर्षांची आहे. तिच्यासाठी शंकरबाबा वराचा शोध घेत होते. योगायोगाने धामणगाव येथील बसंत अग्रवाल या ३० वर्षीय अपंग मुलाला ही बाब माहिती झाली. तेथील सुनील पाठक यांनी शंकरबाबांना या मुलाची माहिती दोन्ही पायाने बसंत हा अपघाताने विकलांग झाला होता. कुबड्याच्या सहाय्याने चालत होता. मुलाने मुलीला पाहिले व आपली पसंती दिली. या आश्रमाचे सर्वेसर्वा प्रभाकरराव वैद्य यांचे घरी बाबा मुला-मुलींना घेऊन आले आणि एकमेकांच्या पसंतीचे विचार करुन त्यांचा साक्षगंध ५ एप्रिल रोजी प्रभाकरराव वैद्य यांचे घरी करण्यात आले. (प्रतिनिधी)
वसंतीचा विवाहसोहळा
By admin | Published: April 24, 2015 12:18 AM