वाठोडा शुक्लेश्वर : काल-परवा कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाठोडा शुकलेश्वर ते खोलापूर रस्ताच वाहून गेला. चिखलाने माखलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक ठप्प पडली असून, प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे.
वाठोडा शुक्लेश्वर - खोलापूर मार्ग अत्यंत वर्दळीचा असून, पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसाच्या पाण्याने रस्ता वाहून गेल्याने या कामाचे पितळ उघडे पडले. या रस्त्याचे काम पंधरा दिवसांआधीच ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात माती-मुरूम टाकून बुजविला होता. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे घाईघाईत झाली, मात्र त्याचा फटका पहिल्याच पावसात बसला.
मुसळधार पावसामुळे या मुख्य मार्गावरील रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला. आता या मार्गावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना पडला आहे.