भीषण वास्तव : पालकांनीच लावले चिमुकले जीव भिकेलाअमरावती : शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नलवर वाहन थांबले असताना किंवा पायी चालत असताना अंगाला स्पर्श करून हात पुढे करणारे उघडेवाघडे चिमुरडे दृष्टीस पडतात. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा आणि केविलवाणे भाव पाहून कोणाचेही मन द्रवते. परंतु या चिमुरड्यांना अर्थाजर्नासाठी त्यांचे पालकच जबरदस्तीने भीक मागण्यास भाग पाडत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. भीक मागणाऱ्या तीन चिमुकल्यांना मंगळवारी शहर कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या विधिसंघर्षित बालकांच्या पालकांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विकासाचे अनेक टप्पे ओलांडत असतानादेखील चौकाचौकात भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. विशेषत: भीक मागणाऱ्या चिमुरड्यांची संख्या मोठी आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातील मुख्य चौकांमध्ये अनेक लहान मुले वाहनधारकांपुढे, येणाऱ्या -जाणाऱ्यांपुढे हात पसरून पैसे मागताना दिसतात. यातील बहुतांश मुले ही शहरालगतच्या व शहरातील पारधी बेड्यातील आहेत. ही लहान मुले त्यांच्या आई-वडिलांसोबत शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल व जयस्तंभ चौकात ठिय्या मांडून बसलेली असतात. मिळालेल्या भिकेवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दिवसभर भीक मागणे, उड्डाणपूलाखाली जेवण तयार करणे व तेथेच झोपणे, हिच त्यांची दिनचर्या आहे. दिवसभर या चौकांमध्ये सतत वर्दळ असते. त्यामुळे सिग्नलवर वाहने थांबताच ही लहान मुले वाहनांजवळ जावून चालक किंवा प्रवाशांना केविलवाणा स्पर्श करतात, महिलांच्या साड्यांचे पदर ओढून भीक मागतात.
वात्सल्याचा बाजार
By admin | Published: June 16, 2016 12:10 AM