धारणी : तालुक्यातील मोगर्डा येथून लग्नाचे वऱ्हाड लगतच्या बारू गावाकडे घेऊन जाणारे मालवाहू वाहन चढाई चढताना उलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्या प्रवाशांनी मृत पावलेल्या इसमाचा मृतदेह तेथेच ठेवून घटनास्थळावरून पळ काढला, तर चालकाने वाहन घेऊन पोबारा केला. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला.
तालुक्यातील मोगर्डा गावातील योगेश धांडे या युवकाचा बारू गावात विवाह संपन्न होणार होता. त्याकरिता गावातील त्याच्या नातेवाइकांसह इतरही नागरिक एमएच २७ एफ ३७९१या वाहनाने सकाळी ११ वाजता बारू गावाकडे मान्सू धावडी मार्गे कच्च्या रस्त्याने निघाले होते. त्या रस्त्यावरील गडगा धरणाजवळ चढ चढताना चालकाने हलगर्जीपणाने वाहन चालवल्याने वाहन उलटले. त्यात वाहनातील उबलाल मंगल सावळकर (४०, रा. मोगर्डा) यांच्यासह सर्वच प्रवासी खाली पडले. त्यात उबलालचा जागीच मृत्यू झाला, तर कुंजीलाल धुर्वे, साबूलाल धुर्वे, सुधीर धुर्वे हे तिघे गंभीर जखमी झाले. उबलालचा मृतदेह घटनास्थळीच पडला होता. त्यादरम्यान त्या वाहनात असलेला कमलेश याने त्याची पत्नी कमला सावलकर हिला उबलालच्या मृत्यूची माहिती दिली. पोलिसांना माहिती दिली. त्यांनी उबलालचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणला. तीन जखमींवर बिजूधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी दिनेश अंभोरे यांनी उपचार केले. याप्रकरणी धारणी पोलिसांनी चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला.
...अन् योगेशचा विवाह झालाच नाही
योगेश धांडे यांचा विवाह रविवारी बारू गावात संपन्न होणार होता; परंतु विवाहाला जाताना वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात झाल्याने उबलालचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे योगेश तेथे पोहचू शकला नाही. त्याच्या विवाहाला गालबोट लागल्याने रविवारी योगेशचा विवाह होऊ शकला नाही.