प्रसन्न दुचक्के अमरावतीआतापर्यंत नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारकाला वाहन क्रमांक मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. हा त्रास वाचविण्याकरिता परिवहन आयुक्तांकडून ‘एसएमएस गेट वे’ प्रणाली सुरु करण्यात आली आहे. यामध्ये वाहनधारकाच्या भ्रमणध्वनीवरच थेट एसएमएसद्वारे वाहन क्रमांक पाठविला जाणार आहे.ग्राहकाने वितरकाकडून वाहन खरेदी केल्यास वितरक शो-रूम मध्येच मोटार वाहन निरीक्षकाला बोलवितात. विक्री केलेल्या वाहनांची निरीक्षक काटेकोरपणे पाहणी करतात. दुसऱ्या दिवशी वितरकाचा प्रतिनिधी परिवहन कार्यालयात जातो. तेथे नोंदणी शुल्क भरुन नमुना २० क्रमांकाचा अर्ज भरतो. या अर्जावर मोटार निरीक्षकांची स्वाक्षरी झाल्यावर हा अर्ज स्वाक्षरीसाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. त्यांच्या स्वाक्षरीनंतर वितरण प्रतिनिधी वाहनाचा कर परिवहन कार्यालयात जमा करतो. नमुना क्रमांक २० अर्जाची परिवहन कार्यालयात नोंद झाल्यावर हा अर्ज डाटा एंट्रीसाठी पाठविला जातो. त्यानंतर या अर्जावर वितरक प्रतिनिधीची स्वाक्षरी होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणत: तीन दिवसांचा कालावधी लागतो. ही प्रक्रिया पूर्ण होताच आता वाहनधारकाच्या भ्रमणध्वनीवर एसएमएसद्वारे वाहनाचा क्रमांक तत्काळ पाठविला जात असल्याची माहिती सहायक प्रणाली प्रशासक महेश मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या नव्या प्रणालीमुळे वाहनधारकांसह परिवहन अधिकाऱ्यांच्याही वेळेची बचत होणार आहे.
‘एसएमएस’द्वारे वाहन क्रमांक
By admin | Published: July 05, 2014 12:25 AM