अमरावती : राज्यात खासगी व अन्य वाहन नोंदणीला १ मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. या आदेशानुसार नव्याने वितरित होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पुढील आदेश येईपर्यंत आरटीओमध्ये अभ्यागतांना प्रवेश मिळणार नसल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवेतील वाहनांच्या नोंदणीस आरटीओ यांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. या उलट खासगी वाहनांच्या नोंदणीला १ मेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र शासनाने ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत ३० जून पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण आणि नक्कल प्रत मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या चालकांना कोणतीही अडचण येणार नाही, शिवाय आधीच वाहन नोंदणीसाठी अर्ज केलेल्या वाहनांची नोंदणी पूर्ण होणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस आरटीओमध्ये प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी सांगितले.
बॉक्स
निर्णयाचा मोठा फटका खासगी वाहन विक्री आस्थापनांना बसेल. या निर्णयामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी रखडणार आहे. तथापि, शासनाने लागू केलेले निर्बंध उठताच संबंधित वाहनांची नोंदणी केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.