गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी उत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी हे नाते काही औरच आहे. हे हेरून चायना फटाक्यांनी येथील बाजारपेठ काबीज केली. स्वस्त असल्याने प्रत्येकाचा त्याकडे ओढा असतो. यंदा मात्र भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चायना फटाक्यांना नकार मिळत आहे. विक्रेत्यांनीही नागिरकांशी सहमत होऊन चायना फटाके न विकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
अमरावती शहरात दरवर्षी तीन ती चार कोटींची उलाढाला फटाका विक्रीच्या व्यवसायात होते. गत काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद सुरू आहे. दोनही देशाचे सैनिक आमने-सामने आहे. दरम्यान भारताने चीनचे काही मोबाईलपवर बंदी घातली आहे. वातानुकूलित यंत्र, खेळणी आदी साहित्यावर बंदी घातल्याने भारतासोबतचे संबंध आणखीच ताणले गेले आहेत. त्याच्या परिणामी अमरावती शहरातील साधारणत: ८० फटाका परवानाधारकांनी चायना फटाके विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा एकट्या अमरावती फटका बाजारात एक ते दीड कोटी रुपयांच्या चायना फटका विक्रीला ब्रेक लागेल, असे चित्र आहे. ग्राहकांचा कल पाहून आंध्र प्रदेशातील शिवकाशी, राजस्थान, मध्य प्रदेश येथील भारतीय बनावटीचे फटाके बाजारात विक्रीस असणार आहेत.यंदा दिल्लीतील विक्रेत्यांना ऑर्डर नाही
दरवर्षी दिवाळीच्या महिना-दोन महिन्यांपूर्वी चायना फटाके विक्रेत्यांचे प्रतिनिधी ऑर्डर नोंदविण्यासाठी येतात. स्थानिक फटाके विक्रेत्यांकडून नोंदणी केल्यानंतर दिवाळीच्या १० ते १५ दिवसांपूर्वी दिल्ली येथून चायना फटाके पाठवितात. परंतु, यंदा चायना फटाक्यांची नोंदणी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अमरावती बाजारपेठ यंदा चायना फटाक्यांशिवाय दिसणार आहे.
यंदा दिवाळीत चायना फटाक्यांची विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे कोणत्याही फटाक्यांच्या दुकानात चायना फटाके असणार नाहीत. ग्राहकांनीसुद्धा चिनी बनावटीच्या फटाक्यांची मागणी करू नये.- सोमेश्वर मोरे, फटाका विक्रेता
चायना फटाके आरोग्यासाठी घातक ठरणारे आहेत. स्वस्त दरात असतानाही आम्ही ते खरेदी करीत नव्हतो. भारतीय बनावटीच्या फटाक्यांनाच आधीपासून पसंती आहे.- श्याम साबू, अंबादेवी मार्ग, अमरावती