अमरावती : परराज्यातील चाेरीच्या ट्रकचे बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्री प्रकरण अमरावती आणि नागपूर येथील आरटीओच्या गळ्याचा फास बनत चालला आहे. नवी मुंबई पोलिसाच्या गुन्हे शाखेने अमरावती आरटीओतील आठ वाहनांच्या नोंदणी झालेल्या कागदपत्रांची पडताळणी चालविली आहे. याप्रकरणी चौकशीअंती आरटीओतील दोषी अधिकारी-कर्मचारी पोलिसांच्या रडारवर असून, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोमवारी अमरावती आरटीओकडून चाेरीच्या ट्रकचे बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी झालेल्या आठ प्रकरणांची कागदपत्रे सुपुर्द करण्यात आली आहेत. यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी कागदपत्रांच्या आधारे ३० एप्रिल रोजी मोटर वाहन निरीक्षक गणेश वरुठे, सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके या तिघांंनाही आरोपी बनवून अटक केली आहे. आरटीओच्या या तीनही अधिकाऱ्यांना अद्यापही जामीन मिळाला नाही, ते मुंबई येथील कारागृहात बंदिस्त असल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी नवीन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेेने आठ वाहनांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. या कागदपत्रांचे पोलिसांकडून सर्चिंग सुरू झाले असून, आरटीओत चाेरीच्या ट्रकचे बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी प्रकरणाचा प्रवास कसा सुरू होताे, याची शहानिशा केली जात आहे. यात आरटीओच्या कोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हात ओले केले, या दिशेने पोलिसांनी तपास आरंभला आहे. कायदेशीररीत्या हे प्रकरण न्यायालयात सिद्ध करता यावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कागदपत्रांची जुळवाजुळव युद्धस्तरावर केली जात आहे. अमरावती आरटीओंकडून आठ वाहनांची कागदपत्रे मिळाली आहेत. आता या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. परराज्यातील चाेरीच्या ट्रकचे बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी हा प्रकार गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना तो जाणीवपूर्वक करण्यात आला का? या दिशेने तपास केला जात आहे. गुन्हेगारांना सोडणार नाही. याप्रकरणी रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे.- अमित काळे, एसीपी गुन्हे शाखा, नवी मुंबई विदर्भातील आरटीओत दलालराजअरुणाचल, उत्तर प्रदेश, नागालँड, दिल्ली व हरयाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसिस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे विदर्भातील आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने वाहनांची नोंदणी करून विक्री करणे हा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नागपूर, अमरावती आरटीओचे दलाल कनेक्शन बाहेर आणले. गत सहा महिन्यांपूर्वी बुलडाणा आरटीओतसुद्धा बनावट कागदपत्रांचे प्रकरण निदर्शनास आले होते. विदर्भात अमरावती, नागपूर, यवतमाळ, बुलडाणा, गोंदिया, अकोला आरटीओत मोठ्या प्रमाणात दलालराज असल्याची माहिती आहे.