परतवाडा : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेवरच महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने आक्षेप नोंदविला आहे.
पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र (विविध जिल्हा शाखा) यांचे निवेदनावर नमूद सर्व अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सहसचिव, विभागीय सचिव, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी यांनी ते नोंदणीकृत पशुवैद्यक नसताना त्यांच्या नावासमोर डॉक्टर या शब्दाचा उल्लेख केला आहे. भारतीय पशुवैद्यक कायदा १९८४ मधील कलम ५६ च्या तरतुदीनुसार हा दखलपात्र गुन्हा आहे.
भारतीय पशुवैद्यक कायदा १९८४ कलम ५९ अन्वये आणि उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरचे ४ मे २००९ च्या आदेशानुसार, संबंधितांवर खाते स्तरावरून तत्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर डॉक्टर उपाधी ही नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच लावणे अभिप्रेत असल्याचे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद नागपूर यांनी आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या ३१ डिसेंबर २०१६ च्या, शासन परिपत्रकानुसार, परिशिष्टमधील शासनमान्य यादीत, पशुचिकित्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र या संघटनेचे नाव नमूद नाही, असेही त्या पत्रात महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने स्पष्ट केले आहे.
संतापजनक बाब
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे, कोणत्याही प्रकारचे पशुवैद्यक शास्त्राचे ज्ञान प्राप्त न करता आवश्यक ती शैक्षणिक अर्हता नसताना जनावरांवर उपचार करून मुक्या प्राण्यांच्या जीवाशी राज्यात खेळ चालला आहे. निर्धास्तपणे डॉक्टर ही उपाधी लावून ते पशुवैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. ही अतिशय संतापजनक बाब आहे. या अशा स्वयंघोषित बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांविरुद्ध राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून तक्रारी प्राप्त होत असल्याचे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने म्हटले आहे.
अम्ब्रेला ट्रीटमेंट
स्वयंघोषित बोगस पशुवैद्यकीय डॉक्टर अम्ब्रेला ट्रिटमेंट प्रमाणे वाटेल ते औषध गरज नसताना देतात. या औषधाचे त्यांना डोस माहीत नाहीत. आजार कोणत्या जिवाणूमुळे झाला याचे ज्ञान नाही. कोणते औषध गाभण जनावराला द्यायचे व कोणते औषध दुधाळ जनावरांना द्यायचे हेही माहीत नाही. दुधात किती ड्रग रेजिस्टन्स येतात, याचे ज्ञान नाही. यात ड्रग रेजिस्टन्स डेव्हलप होतात. मानव जातीतसुद्धा ट्रान्समिट होणारे ‘सुपर बग‘ निर्माण होतात.
कोट यायचा आहे.