परतवाडा : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेवरच महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने आक्षेप नोंदविला आहे.
पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र यांच्या निवेदनावर नमूद सर्व अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सहसचिव, विभागीय सचिव, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी यांनी ते नोंदणीकृत पशुवैद्यक नसताना त्यांच्या नावासमोर ‘डॉक्टर‘ शब्दाचा वापर केला आहे. भारतीय पशुवैद्यक कायदा १९८४ मधील कलम ५६ चे तरतुदीनुसार हा दखलपात्र गुन्हा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय पशुवैद्यक कायदा १९ कलम ५९ अन्वये आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे ४ मे २००९ च्या आदेशानुसार, संबंधितांवर खाते स्तरावरून तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. सदर डॉक्टर उपाधी ही नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच लावणे अभिप्रेत आहे, असे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद नागपूर यांनी आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
संतापजनक बाब
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे, कोणत्याही प्रकारचे पशुवैद्यक शास्त्राचे ज्ञान प्राप्त न करता, आवश्यक ती शैक्षणिक अर्हता नसताना जनावरांवर उपचार करून मुक्या प्राण्यांच्या जीवाशी राज्यात खेळ चालला आहे. निर्धास्तपणे ‘डॉक्टर‘ची उपाधी लावून ते पशुवैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ही अतिशय संतापजनक बाब आहे. अशा स्वयंघोषित बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांविरुद्ध राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून तक्रारी प्राप्त होत असल्याचे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने म्हटले आहे.
अम्ब्रेला ट्रीटमेंट
स्वयंघोषित बोगस पशुवैद्यकीय डॉक्टर अम्ब्रेला ट्रिटमेंटप्रमाणे वाटेल ते औषध गरज नसताना देतात. या औषधाचे त्यांना डोस माहिती नाही. आजार कोणत्या जिवाणूमुळे झाला, याचे ज्ञान नाही. कोणते औषध गाभण जनावराला द्यायचे व कोणते औषध दुधाळ जनावरांना द्यायचे याचीही माहिती नाही. दुधात किती ड्रग रेसिडू येतात, याचेही ज्ञान नाही. यात ड्रग रेजिस्टन्स विकसित होतात. मानव जातीतसुद्धा ट्रान्समिट होणारे "सुपर बग" निर्माण होतात.
कोट
नोंदणीकृत अर्हताधारक पशुवैद्यक नसताना नावासमोर डॉक्टर या शब्दाचा वापर करता येत नाही. तो दखलपात्र गुन्हा आहे. ‘डॉक्टर‘ ही उपाधी नोंदणीकृत अर्हताधारक पशुवैद्यकांनीच लावणे अभिप्रेत आहे.
- डॉ. अजय पोहरकर, अध्यक्ष, राज्य पशुवैद्यक परिषद नागपूर
कोट २
पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेचे नाव शासन मान्य यादीत नाही. असे राज्य पशुवैद्यक परिषदेने म्हटले आहे. पण आमची संघटना इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट १९२६ अंतर्गत रजिस्टर आहे. अनेक वर्षापासून कार्यरत आहे. आमच्या संघटनेचा राज्य पशुवैद्यक परिषदेशी काही एक संबंध नाही. आमची संघटना स्वतंत्र आहे.
- डॉ. सुनील काटकर,
अध्यक्ष, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, महाराष्ट्र