मोर्शीत उपोषण मंडपावर पेट्रोल ओतले : मांस विक्री, गोहत्या थांबवामोर्शी : उघड्यावरील मांस विक्री रोखण्यासाठी विश्वहिंदू परिषद आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. मंगळवारी रात्री अज्ञात आरोपीने मंडपावर पेट्रोल ओतल्याप्रकरणी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. याप्रकरणी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला रुद्रावतार दाखविला. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोहत्याबंदी कायदा राज्यात लागू करण्यात यावा, गोहत्या बंद करण्यात यावी, गोवंशाची अवैध वाहतूक बंद करण्यात यावी, शहर व ग्रामीण भागातील गोवंशाच्या कत्तली थांबविण्यात याव्यात या प्रमुख चार मागण्यांकरिता मंगळवारपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. या बेमुदत उपोषणात वरील संघटनांचे एकूण १४ कार्यकर्ते उपोषणास बसले होते. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास कार्यकर्ते उपोषण मंडपात असताना त्यांना पेट्रोलचा वास आला. त्यांनी मंडपाबाहेर पाहिले असता अज्ञात आरोपी पळून गेल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती विश्वहिंदू परिषदेचे प्रमुख राजेश बुरंगे यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क केला असता पोलिसांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविणार असल्याचे सांगितल्यानंतर गिते यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठविले. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. येथील पोलीस प्रशासन धिम्या गतीने कारवार्ई करीत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे अवैध कार्याला अभय मिळत असल्याचे स्पष्ट होते. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे असल्याचे बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यानिमित्त पूर्व तयारीसाठी सुनील देशमुख, प्रवीण पोटे, अनिल बोंडे, रमेश बुंदिले, रवी राणा या आमदारांसह विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर आले होते. ही हकीकत ऐकून विभागीय आयुक्तांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना भ्रमणध्वनीवर याप्रकरणी खडसावले. या प्रकरणाचे पडसाद शहरात पसरु नये म्हणून शिरखेड येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच जिल्हा पोलीस कक्षातून येथे दंगल नियंत्रक पथकास तैनात करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द उपोषणास बसलेले शिरखेड येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते श्याम भोकरे यांच्या तक्रारीवरुन मोर्शी पोलिसांनी भादंवीच्या कलम ४३५, ५११ अंतर्गत गुन्हा नोंदविला, असून पोलीस तपास करीत आहे. उपोषणस्थळी पोलिसाची नियुक्ती करण्यात आली होती; तथापी संबंधित कर्मचारी हा घटनेच्या वेळी मंडपस्थळी नव्हता, असे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
विहिंप, बजरंग दलाचा रुद्रावतार
By admin | Published: November 26, 2014 10:59 PM