गीतांजलीच्या डब्यावर चढला : अपघातापूर्वीच २५ हजार मेगावॅटचा वीज पुरवठा केला खंडितश्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराबडनेरा रेल्वे स्थानकावर नेहमीसारखीच वर्दळ होती. गाड्या ये-जा करीत होत्या. प्रवाशांची जागेसाठी पळापळ सुरू होती. अकस्मात गीतांजली एक्स्प्रेसच्या डब्यावर एक युवक सैरावैरा पळताना दिसला. ही गोष्ट रेल्वे अधिकाऱ्यांना कळली. क्षणात रेल्वे डब्यावरून गेलेल्या हाय व्होल्टेज विद्युत तारांचा स्पर्श होऊन युवकाला धोका संभवतो, ही बाब त्यांच्या लक्षात आली. प्रसंगावधान राखून त्यांनी भुसावळच्या वरिष्ठांशी संपर्क केला आणि तत्काळ विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे त्या युवकाचे प्राण वाचले. रवी हजारीसिंग (२१, रा. ओडिशा) असे या युवकाचे नाव आहे. घटनेनंतर युवकाला पोलिसांच्या मदतीने खाली उतरवून लगेच त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी मुंबई- हावडा गीतांजली एक्स्प्रेसने ओडिशा येथे जाण्याकरिता बडनेरा रेल्वे स्थानकावर दोन भाऊ आले होते. त्यांच्यामध्ये मोबाईल हाताळण्यावरुन अचानक वाद झाला. यातूनच रवीने चक्क प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या मुंबई - हावडा गीतांजली एक्स्प्रेसच्या डब्यावर झेप घेतली. युवक डब्यावर चढल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. इंजिनला जोेडलेल्या पहिल्या डब्यावर चढून रवी हा मोठ्य़ा भावाकडे मोबाईलची मागणी करु लागला. मात्र रेल्वे गाड्यांसाठी सुरु असलेला विद्युत प्रवाह हा २५ हजार मेगावॅट क्षमतेचा असल्यामुळे डब्यावर चढलेला युवक प्राण गमावण्याची शक्यता होती. ‘त्या’ युवकावर पोलिसांची कारवाईबडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.टी. कोटांगळे यांनी थेट भुसावळ येथील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनाक्रम सांगितला. भुसावळच्या अधिकाऱ्यांनी बडनेरा येथील विद्युत पुरवठा तत्काळ बंद केला. या सर्व प्रकारामुळे मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस २० मिनिटे उशिरा सोडण्यात आली. मात्र, २५ हजार मेगावॅट क्षमतेच्या विद्युत पुरवठ्यातून एका युवकाचे प्राण वाचविता आले, याचे समाधानही रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतरही हा युवक रेल्वेच्या १४ ते १५ डब्यांवर धावत सुटला. या युवकाचा पाठलाग करीत रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सुध्दा धावपळ करीत होते. हा प्रकार बघण्याकरिता बघ्यांची गर्दी जमली होती. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच रवी हजारीसिंग याने शेजारच्या रूळावर थांबलेल्या मालगाडीच्या डब्यावरही धाव घेतली. परंतु रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक पटेल यांच्या नेतृत्वातील चमूने त्याला ताब्यात घेतले. रेल्वे सुरक्षा दलाने या दोन्ही भावांची चौकशी केली असता ते ओडिशा येथील रहिवासी असून मोबाईल हाताळण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.
अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले युवकाचे प्राण
By admin | Published: December 30, 2015 1:21 AM