- प्रदीप भाकरेअमरावती - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये विदर्भ चांगलाच माघारला आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत. एकीकडे ४ जानेवारीपासून केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया) स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणीस प्रारंभ झाला असताना, विदर्भातील जिल्ह्याची अकराही शहरे पहिल्या शंभरात नसल्याने स्वच्छ सर्वेक्षणाच्या त्यांच्या गुणांकनावर मोठा परिणाम होणार आहे. या देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणात ४ हजारांपेक्षा अधिक शहरे सहभागी झाले आहेत. त्यात अमरावती महापालिकेचे डायनॅमिक रॅकिंग १३० असे समाधानकारक आहे, तर बुलडाणा नगर परिषद ९८९ व्या क्रमांकावर आहे. देशभरातील स्वच्छ शहरांचे गुणांकन करण्यासाठी सलग चौथ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण केंद्राने हाती घेतले आहे. ५ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाचीतपासणी ४ जानेवारीपासून सुरू झाली असून, स्वच्छता अॅपच्या वापरासाठी त्यापैकी सुमारे ४०० गुण आहेत. स्वच्छता अॅप किती नागरिकांनी डाऊनलोड केलेत, वापरकर्त्यांचा सहभाग, संबंधित नागरी स्वराज्य संस्थेचे जबाबदारी व वापरकर्त्याचा अभिप्राय या चार घटकांवर स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान ४००० शहरांचे डायनॅमिक रॅकिंग ठरविण्यात येते. ११ आॅगस्ट २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत संबंधित शहरांनी किती संख्येत स्वच्छता अॅप डाऊनलोड करुन त्यावर अस्वच्छतेविषयक तक्रारी केले. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्या तक्रारींची किती कालावधीत सोडवणूक केली व त्यानंतर संबंधित तक्रारकर्ता वा वापरकर्त्याने तक्रार व सोडवणुकीबाबत कसा अभिप्राय दिला, या चार घटकांवर ४०० गुणांची मदार आहे.केंद्राच्या क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे असेसर्स स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीदरम्यान नागरिकांच्या अभिप्रायांसह स्थळनिरीक्षण करणार आहेत. त्यात स्वच्छता अॅपच्या माध्यमातून अस्वच्छतेविषयक तक्रारींची नेमकी कशी सोडवणूक करण्यात आली, याची तपासणी केली जाणार आहे. त्याचअनुषंगाने जाहीर झालेल्या स्वच्छता अॅपच्या डायनॅमिक रॅकिंगमध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यांची शहरे माघारल्याने त्यांना स्वच्छता अॅपसाठी असलेल्या एकूण ४०० गुणांमधून किती गुण प्राप्त होतात, याकडे शहरवासीयांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.
शहरनिहाय डायनॅमिक रॅकिंगअमरावती - १३०,अकोला - २५९, बुलडाणा - ९८९, यवतमाळ - १३१, वाशिम - ४०१, नागपूर - ८६९, वर्धा - ३०४, चंद्रपूर - २१२, भंडारा - ९४०, गोंदिया - ९८७ व गडचिरोली - ४५१