अमरावती : पिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रब्बी पीक स्पर्धा-२०२१ चा निकाल कृषी आयुक्त तथा अध्यक्ष, मुख्य स्पर्धा समितीद्वारा जाहीर करण्यात आला. यामध्ये विदर्भातील शेतकरी अव्वल ठरले आहेत.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी व करडई पिकांसाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धा समितीची बैठक १० मार्च २०२१ ला पार पडली होती. यामध्ये विभागस्तरावरुन प्राप्त उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार राज्यस्तरीत सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी विजेत्या शेतकऱ्यांची नावे २७ मार्च २०२३ रोजी घोषित करण्यात आलेली आहे.
यामध्ये रब्बी हरभरा (सर्वसाधारण गट) मध्ये भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील उसरीपाल येथील मदनपाल भोजराज भोयर या शेतकऱ्यांने हेक्टरी ६८.४० क्विंटल उत्पादन घेत प्रथम, याच तालुक्यातील नवेगाव बु. येथील विक्रांत रामभाऊ मोहतुरे द्वितीय व अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथील सचिन क्षिरसागर यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे.
याशिवाय रब्बी गहू (आदिवासी गट) यामध्ये अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात पलश्या गावातील नंदा काल्या चिमोटे प्रथम, नाशिक जिल्हा व तालुक्यातील घोडेगाव येथील सोमनाथ गणपत बेंडकोली द्वितीय व नंदूरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील डोगेगाव येथील नितीन सुभाष वसावे यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. विजेत्या शेतकऱ्यांची नावे तालुका व जिल्हा स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहेत.