संदीप मानकर अमरावती४८ तासांनंतर तापमानात आणखी घट होणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. आणखी काही दिवस थंडीचा जोर विदर्भात कायमच राहिल, असे त्यांचे म्हणणे आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रावर व केरळच्या किनारपट्टीनजीक कोमोरिनवर चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भावर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने १७ जानेवारीला मंगळवारी हिमालयीन क्षेत्रात पुन्हा बर्फवृष्टीची शक्यता आहे. यामुळे १७ जानेवारीनंतर तापमानात घट येऊ शकते. दरम्यान रविवारी थंडी थोडी कमी झाली असून किमान १०.५ अंश सेल्सिअस तर कमाल २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथील श्रीे शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागात करण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडल्यास थंडीचा जोर कमी होण्यास याची मदत होईल. सद्यस्थितीत नागरिक कडाक्याच्या थंडीचा सामना करीत आहेत. त्यामुळे रात्री नऊनंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. शाळांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकट्या पेटविल्या जात आहेत. २० जानेवारी नंतर थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
४८ तासांनंतर विदर्भात तुरळक पावसाची शक्यता
By admin | Published: January 16, 2017 12:03 AM