वैभव बाबरेकर अमरावतीजागतिक तापमानाच्या प्रभावाने यंदा विदर्भातील एखाद्या ठिकाणचे तापमान थोड्या वेळापुरते ५० डिग्रीवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तापमानाने ५० डिग्रीचा उच्चांक गाठला तर विदर्भवासी अक्षरश: होरपळून निघण्याची शक्यता आहे.दरवर्षी उन्हाळ्यातील तीव्र झळांमुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होते. मात्र, यंदा तापमान सर्वात उच्चांक गाठणार असल्याच्या अंदाजाने हाहाकार माजण्याची शक्यता आहे. थोडावेळापुरते का होईना जर तापमानाने ५० डिग्रीचा उच्चांक गाठला तर नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण होणार आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते सद्यस्थितीत हिमालयावरील पश्चिमी विक्षेप दूर सरकत असून त्यामुळे काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. पंजाब आणि अंतर्गत कर्नाटकच्या दिड किलोमिटरवर चक्राकार वारे आहेत. अन्य कोणतीही कमी दाबाची प्रणाली नसल्यामुळे पावसाची शक्यता नाही. मात्र, कमाल तापमान येत्या दोन ते तीन दिवसांत २ डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असून किमान तापमान हळूहळू वाढणार आहे. पुढील आठवड्यातील १५ ते २३ एप्रिल दरम्यान कमाल तापमान ४३ ते ४४ डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एखाद्या दिवसाकरिता तापमान ४६ डिग्रीवर जाऊ शकते. २०१६ हे वर्ष सर्वाधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात एखाद्या ठिकाणचे तापमान ५० डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.आगी, वणवा, प्रदूषणाचा सर्वाधिक प्रभावजागतिक तापमान वाढत असल्यामुळे यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा आहे. दिवस हा १३ तासांचा असल्यामुळे सकाळपासून उन्हाचा प्रभाव जाणवायला लागतोे. उन्हाळ्यात सूर्याची किरणे लंब रुपाने थेट पडत असल्यामुळे उन्हाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळते. त्यातच वाहनांचे प्रदूषण व औद्योगिक प्रदूषणामुळे तापमानात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत लागणाऱ्या आगी, वणवा, शेतीचे धुरे पेटविणे आदींच्या प्रभावाने तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचे मत हवामान तज्ज्ञांचे आहे. जागतिक तापमानवाढीच्या परिणामामुळे यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्णतेचे असल्याचा अंदाज पुणे येथील वेध शाळेने दिला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात एखाद्या ठिकाणचे तापमान थोड्या अवधीकरिता ५० डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. - अनिल बंड,हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय
काही वेळाकरिता तापमान गाठणार ५० डिग्रीचा उच्चांक विदर्भवासी होरपळणार : हवामान खात्याचा अंदाज
By admin | Published: April 16, 2016 12:14 AM