अमरावती : विदर्भ राज्याच्या मागणीसह विजेचे सतत वाढविण्यात येणारे दर कमी करावे, कृषिपंपाचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, यासाठी अवघ्या विदर्भात २४ डिसेंबर रोजी मुख्य अभियंता वीज महावितरण कार्यालयासमोर एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलनाचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी दिली.स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी व विदर्भातील सर्व जनतेचे, झोपडपट्टीवासी, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कारखानदारांचे विजेचे दर निम्मे करा, अतिवृष्टीबाधित शेतक-यांना एकरी ३० हजार, फळबागांसाठी ५० हजार रुपये भरपाई द्या, औष्णिक वीज प्रकल्पामुळे प्रदूषित झालेले विदर्भ प्रदूषणमुक्त करा, भारनियमन कमी करा, या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्याचे ठरविले असून, 'विदर्भ मिशन २०२३' या नावाने चार टप्प्यांत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे.यामध्ये अकोला येथे १५ जानेवारी, अमरावती येथे १७ जानेवारी, नागपूर येथे २० जानेवारी २०२०, चंद्रपूर येथे २२ जानेवारी व गोंदिया येथे २४ जानेवारी रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचे निश्चित झाले आहे. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी विदर्भातील १२० तालुक्यांत रास्ता रोको, जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी २०२० रोजी नागपूरला रेल रोको व १ मे रोजी संपूर्ण विदर्भ बंदची हाक त्यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी जिल्हा समन्वयक राजेंद्र आगरकर, जिल्हाध्यक्ष दिलीप भोयर, अजय केजडीवाल, नीळकंठ यावलकर, रियाज अहमद खान, अमोल भिसेकर, विजय कुबडे, सुनील साबळे, नरेंद्र कठाळे, राजाभाऊ पिंजरकर, रंजना मामर्डे आदी उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 6:31 PM