श्यामकांत सहस्त्रभोजने
बडनेरा (अमरावती) : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बडनेरा येथील उपबाजारात विदर्भातील पहिला रेशीम कोश खरेदी बाजार सोमवारी भरला. विदर्भातील कानाकोपऱ्यांतील रेशीम कोश उत्पादक येथे विक्रीसाठी कोश घेऊन आले होते. ६० हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर प्राप्त झाला.
पहिल्याच दिवशी ८२४ क्विंटल २४ किलो आवक झाली. त्यापोटी शेतकऱ्यांना ४ लाख ९९ हजार २०९ रुपये प्राप्त झाले. सर्वाधिक ६०६ रुपये किलो असा दर ब्राह्मणवाडा येथील सुनील विठ्ठल धावडे यांच्या कोशाला प्राप्त झाला. बाजार समितीला या बाजारातून ५२२५ रुपयांचा सेस प्राप्त झाला आहे.
बुलढाणा, नरखेड, नेर, पुसद, महागाव, काटोल या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी येथे कोश विक्रीसाठी आणले होते. या बाजाराचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी व रेशीम उत्पादक पौर्णिमा सवई यांनी केले. याप्रसंगी महारेशीमचे उपसंचालक महेंद्र ढवळे, सहायक संचालक अरविंद मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर, बडनेरा येथील रेशीम कोश बाजाराचे इन्चार्ज राजेंद्र वानखडे, सहायक सचिव बी. एल. डोईफोडे, निरीक्षक आर. डी. इंगोले यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आठवड्यातून दोन दिवस बाजार
बडनेरा येथील उपबाजारात आठवड्यातून गुरुवार व सोमवार असे दोन दिवस रेशीम कोशाची खरेदी होणार आहे. बाजार उपलब्ध झाल्याने विदर्भात रेशीम शेतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.