अमरावती : एका परदेशस्थ पूर्वप्रियकराने पूर्वप्रेयसीची बदनामी करण्यासाठी तिच्यावर केलेल्या अतिप्रसंगाचा व्हिडिओ तिच्या पतीला ई-मेलने पाठविला. ही धक्कादायक घटना १७ ऑक्टोबर रोजी येथे उघड झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी अमेरिकेतील टेक्सास शहरातील रहिवासी आहे. या ‘हायप्रोफाइल प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी त्या परदेशस्थ तरुणाविरुद्ध बलात्कार, विनयभंग, बदनामी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचे नाव राज ज्ञानेश्वर धोंडे (रा. अंबर अपार्टमेंट, दुसरा मजला, हव्याप्रमंडळाजवळ, अमरावती, ह.मु. टेक्सास, अमेरिका) असे आहे. तक्रारीनुसार, पीडित विवाहिता ही तिच्या पतीसह पुणे येथील घरी असताना १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४३ मिनिटांनी तिच्या पतीला एक ई-मेल आला. ई-मेलवर आलेली लिंक उघडताच त्यात त्या विवाहितेचे पूर्वप्रियकरासोबत शारीरिक संबंध करताना व्हिडिओ व काही खासगी फोटो दिसले. याप्रकरणी त्यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, त्या व्हिडिओत असलेले शरीरसंबंधाचे घटनास्थळ फ्रेजरपुरा पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने ते प्रकरण अमरावती पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
तक्रारीनुसार, तक्रारकत्या महिला अमरावतीमध्ये बारावीचे शिक्षण घेत असताना तिची राज धोंडे याच्याशी ओळख झाली. त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. भेटीही झाल्यात. दरम्यान २०१३ मध्ये तो पदवीचे शिक्षण पूर्ण करून वडिलांसोबत अमेरिकेला नोकरीसाठी गेला. ऑक्टोबर २०१५ मध्ये तो भारतात परत आला. त्याने अमरावती येऊन तिला लग्नाची ऑफर दिली. मात्र, राजच्या हट्टी व बळजबरीच्या स्वभावामुळे आपणच त्यास लग्नाला नकार दिला. मात्र, आमच्यातील मैत्री कायम राहिल्याचे पीडिताचे म्हणणे आहे.
भाड्याच्या खोलीत अत्याचार, व्हिडिओ व्हायरलची धमकी
ऑक्टोबर २०१४ मध्ये त्याने प्रभा कॉलनी येथील एका भाड्याच्या खोलीत नेऊन अतिप्रसंग केला. त्या खोलीतील कॅमेरा ऑन करून व मोबाइलवर अतिप्रसंगाचे चित्रण केले. त्यामुळे आपले ब्रेकअप झाले. तत्पूर्वी त्याने आपल्या मोबाइलमधील डेटा त्याच्या मोबाइलमध्ये ट्रान्सफर करवून घेतला होता. त्यातील खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने आपल्यावर बळजबरी केली. सन २०१५ च्या अखेरीस तो पुन्हा अमेरिकेत गेला.
त्यानंतर त्याने पीडितेच्या बहिणीला आक्षेपार्ह फोटो पाठविले. तिच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून २ जुलै २०२१ रोजी नातेवाईक व मित्रांना देखील तिचे खासगी फोटो व अन्य आक्षेपार्ह फोटो पाठवून ते व्हायरल करण्यात आले. आरोपीने शारीरिक संबंधांचे व्हिडिओ पाठवून, ते व्हायरल करून सन २०१५ पासून आजपर्यंत आपली बदनामी केली, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.