अमरावती - आपल्या आक्रम शैलीमुळे नेहमीच अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडू यांनी आता चक्क कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदारबच्चू कडू (Bacchu Kadu) नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यातच, शिंदे गटात गेल्यापासून सोशल मीडियावरही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असते. आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या कडू यांना नुकतेच एका सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. आता, पुन्हा एकदा कडूंनी हात उगारल्याचं पाहायला मिळालं.
कडू यांच्या मतदारसंघात सध्या विकासकामाचां धडाका सुरू आहे. तब्बल २०० कोटींच्या विकासकामांची योजनाच त्यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार, मतदारसंघातील गावागावात रस्ते आणि इतर सुविधा पुरविण्यात येत आहेत. याच रस्ते कामासंदर्भातील दौरा करत असताना एका गावात कार्यकर्ता चांगलाच नडल्याचं दिसून आलं.अनेकांनी या कार्यकर्त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आपल्या मतावर ठाम राहून जिद्दीला पेटल्याचं दिसून आलं. याचदरम्यान, राग अनावर झाल्याने आमदार कडू यांनी या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली.
बच्चू कडू हे आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनांनी सर्वपरिचीत होते. मात्र, सध्या शिंदे गटातील नाराज आमदार म्हणून त्यांची ओळख बनली आहे. अमरावती जिल्हातील अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. याचदरम्यान रस्त्याच्या कामकाजा संदर्भात त्यांचा वादविवाद झाला. त्यावेळी, राग अनावर झाल्याने त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशीलात लगावली, त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत, यावेळी कार्यकर्ता व बच्चू कडू यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.