Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का?
By गणेश वासनिक | Published: November 18, 2024 09:25 AM2024-11-18T09:25:26+5:302024-11-18T09:27:56+5:30
Achalpur Vidhan Sabha 2024 Election: यंदा अचलपूर मतदार संघात प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे अनिरूद्ध उर्फ बबलू देशमुख, भाजपचे प्रवीण तायडे यांच्यासह एकूण २२ जण रिंगणात आहे.
गणेश वासनिक
अमरावती : अचलपूर हे ऐतिहासिक प्राचीन शहर आहे. संत गुलाबराव महाराज, बहिरमची प्रसिद्ध यात्रा, अष्टमासिद्धी, इंग्रजकालीन जिल्हा आणि आज नव्याने जिल्हा निर्मितीची मागणी अशी अचलपूर विधानसभा क्षेत्राची ओळख ठरली आहे. मात्र सलग चारवेळा अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत आपली छाप सोडणारे बच्चू कडू हे आता पाचव्यांदा निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सहकार नेते अनिरूद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी बच्चू कडूंपुढे आव्हान उभे केले आहे.
यंदा अचलपूर मतदार संघात प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे अनिरूद्ध उर्फ बबलू देशमुख, भाजपचे प्रवीण तायडे यांच्यासह एकूण २२ जण रिंगणात आहे. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री तर महायुती सरकारात दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद हे बच्चू कडू यांच्या रूपाने अचलपूरला मिळाले आहे. बच्चू कडू आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यात काट्याची टक्कर आहे. कुणबी,दलित, मुस्लीम, बारी, तेली, माळी अशा जाती-धर्माच्या मतदारांचे प्राबल्य आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
बच्चू कडू प्रहार (विजयी)
८१,२५२ मते
बबलू देशमुख, काँग्रेस
७२,८५६ मते
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- बंद पडलेली फिनले मिल्स सुरू करणे, शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण आणि अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी
- शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग ही अचलपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची प्रमुख मागणी.
- भाजपने प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिल्याने तिकीटचे प्रमुख दावेदार ठाकूर प्रमोदसिंह गडरेल यांची उमेदवारी कायम आहे.
- सलग चौथ्यांदा आमदारकीचा विक्रम नोंदविणारे बच्चू कडू यांच्याबाबत ‘ॲन्टी इन्कमबंशी’ आहे. भाजप आणि काँग्रेस ती ‘कॅश’ करण्याची रणनीती आखत आहे.
- बबलू देशमुख यांच्यावर काँग्रेसने पुन्हा विश्वास टाकला असून त्यावर ते खरे उतरताना त्यांच्या प्रचाराच्या रणनितीवरून दिसत आहे. त्यांचा छुपा अजेंडा मतदारांना आकर्षित करताना दिसतो.