प्रदीप भाकरे
अमरावती : तो आला, त्याने पाहिले अन् तो जिंकला, अशा साध्या सरळ शब्दात ‘त्याची’ स्वरश्रीमंती न लोकानुनयाची श्रीमंतीची मोजदाद. तिकडे दक्षिणेत अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा द राईज’ केव्हाच ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला, तर इकडे त्यातील ‘वल्ली’ या गाण्याचे मराठी व्हर्जन गाऊन येथील ‘तो’ रातोरात स्टार झाला. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली!’ ने त्याला ‘फेम’ मिळवून दिला. ती अजब ‘वल्ली’ आहे आपल्या तिवस्यातील विजय खंडारे!. अन् मराठी व्हर्जनमध्ये‘श्रीवल्ली’ अफलातून साकारणारी दुसरी तिसरी कुणी नव्हे, तर त्याची अर्धांगिणी. अजब वल्लीची ‘श्रीवल्ली’तृप्ती!
पुष्पा द राईज चित्रपटातील श्रीवल्ली गाणे समाजमाध्यमांवर सुपरहिट ठरले आहे. तिवसा येथील विजय खंडारे या तरुणाने श्रीवल्लीचे मराठी व्हर्जन बनवले. अन् तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. हिंदी नंतर मराठी भाषेतही हे गाणे दोन आठवड्यापूर्वी युट्यूबवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. तिवसा तालुक्यातील निंभोरा गावाच्या विजय खंडारे याने ‘श्रीवल्ली’ या मराठी गाण्याची निर्मिती केली आहे. सबकुछ ‘विजय’ असा सारा तो मामला. गीतकारही तो. गायकही तोच. पत्नी तृप्ती खंडारेला श्रीवल्लीचा रोल देऊन ३ मिनिट ४४ सेकंदांचा भन्नाट व्हिडीओ बनवला आहे. श्रीवल्ली या गाण्याचे मराठी व्हर्जनला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद असून, १५ दिवसात १५ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
भाजलेले शेंगदाने विकणारा ते यूट्यूबर व्हाया टिकटॉक
युट्युबवर प्रसिद्ध असलेला तरुण विजय खंडारे तिवसा तालुक्यातील निंभोरा देलवाडी या छोट्या गावातील रहिवासी. गावात गुजराण होत नव्हती म्हणून तिवसा या तालुकास्थळी आला. तेथे शेंगदाने विकत असताना टिकटॉकवर आला. मात्र, ते बॅन झाल्याने त्याने यूट्यूब चॅनेल बनविले. मोबाईवर शूटिंग करून तो ते निखळ विनोदी व्हिडीओ चॅनेलवर टाकत राहिला. आज त्याच्या दोन यूट्यूब चॅनेलवरील सबस्क्राईबरची संख्या २ लाखांच्या घरात गेली. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ३०० रुपये रोज कमावणारा विजयचे अर्निंग आय बऱ्यापैकी आहे.
विजयचे वडील नारायण खंडारे हे हातगाडीवर एक छोटा व्यवसाय करतात. त्याची आई गृहिणी आहे. एकतर घर सोड, अन्यथा मुकाट्याने धंदा कर, असे वडिलांनी बजावले. पुढे गावातूनही ‘फेम’ मिळू लागल्याने त्यांनी विजयची पाठ थोपाटली. लढ म्हणाले. वयाच्या पंचविशीत असलेला, विज्ञान पदवीधर विजय चार वर्षांपूर्वी विवाहबध्द झाला. पत्नी तृप्ती व मित्र मनीष पतंगराय, रोशन चौधरी यांना सोबत घेऊन तो यूट्यूबसाठी व्हिडीओ बनवत असतो. तो आपल्या प्रेक्षकांना खळखळून हसवतो.
सेल्फीसाठी होते गर्दी, म्हणाला... भल्लंच बेस वाटतं
तिवसा-्अमरावती मार्गावरून जाणारे ट्रकचालक थांबून विजयसोबत फोटो काढून घेतात. त्यातच आपले यश सामावल्याची प्रामाणिक प्रतिक्रिया विजयसह त्याच्या 'श्रीवल्ली'ने लोकमतला दिली. सेल्फीसाठी भोवती गर्दी होत असल्याने 'भल्लंच बेस वाटतं' असे तो म्हणाला. तिवस्यात राहुनदेखील कलाविश्वात कामगिरी होते, हे त्याने दाखवून दिले. तो आणि त्याच्या पत्नी अगदी साध्या पेहरावात आणि मोबाईलने शूट करत अनेकानेक व्हिडीओ बनवतात. कॅमेरामन म्हणून त्याची लहान बहीण आचल खंडारे त्याला मदत करते.
टीम ‘पुष्पा’देखील व्हुवर
मराठमोळ्या विजयचा ‘श्रीवल्ली’ व्हिडीओ ‘पुष्पा द राईज'च्या टीमनेदेखील पाहिला. अभिनेता अल्लू अर्जुन, अभिनेत्री रश्मीका मंदना तसेच या गाण्याचा मूळ गायक श्रीथ श्रीरावसह चित्रपटाच्या टीमनेही गाणे पाहिले असल्याचे विजय खंडारे याने सांगितले. या मराठी गाण्याच्या व्हिडिओमध्ये विजय आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी शूटिंग दरम्यान घडलेले किस्से ‘लोकमत’शी शेअर केले. गुपचूप खातानाची शूटिंग करायच्या वेळेस अनेकदा रिटेक करावा लागला तरी हातातील गुपचूप खाली पडत नव्हते, असे एक ना अनेक किस्से सांगताना विजय आणि तृप्तीची अद्यापही जमिनीशी नाळ जुळली असल्याचे प्रकर्षाने लक्षात आले.