अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही, त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी नाकारली. त्यामुळे कॉंग्रेस वा माझ्याविरूद्ध त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशी जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून केला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात शेती नुकसानाचा आढावा आणि कॉंग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या विभागीय बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून कॉंग्रेसचा रोडमॅप विषद केला. चंद्रशेखर बावनुकळे हे शुक्रवारी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते नवीन आहेत. त्यांना राहुल गांधी यांना मी सक्रिय नेता आहे, मोठा नेता असे काहीतरी वेगळे करून दाखवयाचे असल्यामुळे ते भाजपवर बोलतात, असे विधान बावनकुळे यांनी केले होते. म्हणूनच शनिवारी वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आणि भाजपवर निशाणा साधला.
पत्रपरिषदेला माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे, ॲड. दिलीप एडतकर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास ईंगोले, प्रवीण मनोहर आदी उपस्थित होते.
महापालिका, जिल्हा परिषदांवर ‘प्रशासकराज’ भाजपलाच हवे
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायतींवर प्रशासकराज हे भाजपलाच हवे आहे. कारण प्रशासकाच्या माध्यमातून त्यांना मनमानी कारभार चालविता येतो. नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका का घेण्यात येत नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आम्ही जनतेच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. भाजपने न्यायालयात वकील उभे करून निकाल लावला पाहिजे. पण भाजप सरकारी वकील तारखेवर येवू देत नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
भिडेंनी पोलिस संरक्षणाबाहेर यावे, जनता दाखवून देईल
संभाजी भिडे हे सतत वादग्रस्त व्यक्तव्य करून महापुरूषांचा अपमान करतात, या विषयावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, संभाजी भिडे उर्फ किडे यांनी पोलिस संरक्षणाबाहेर यावे तेव्हा जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. भिडेंना भाजपसह अन्य हिंदूत्ववादी संघटनांचे बळ मिळत आहे. भिडे हे त्यांचेच सोडलले पिल्लू असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.