अमरावती : घर बांधकामाच्या नकाशावर सही व शिक्का देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कुऱ्हा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला त्याच्याच दालनात ‘ट्रॅप’ केले. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही कार्यवाही करण्यात आली. प्रदीप कृष्णराव भटकर (४९, रा. अर्जुननगर, अमरावती) असे अटक लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.
अंजनवती येथील रहिवासी ५२ वर्षीय तक्रारकर्त्याला घर बांधकामाच्या नकाशावर ग्रामविकास अधिकारी प्रदीप भटकर यांची सही व शिक्का हवा होता. त्यासाठी भटकर यांनी त्यांना तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यात लाचेची मागणी निष्पन्न झाल्यावर सोमवारी सापळा रचण्यात आला. प्रदीप भटकर यांनी आपल्या दालनात तक्रारकर्त्याकडून लाचेची तीन हजारांची रक्कम स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध कुऱ्हा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देवीदास घेवारे, उपअधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत, किशोर म्हसवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, युवराज राठोड, राहुल वंजारी, आशिष जांभोळे, वैभव जायले व बारबुद्धे आदींनी केली.