संपूर्ण बांबू केंद्र, लोकसहभागातून उपक्रम : ग्रामीण कला जोपासण्याची तळमळश्यामकांत पाण्डेय धारणीसंपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून मागिल २० वर्षांपासून लवादा या मेळघाटातील आदिवासीबहुल गावात स्थानिक कारागिरांना प्रोत्साहित करण्याचे अविरत कार्य करणाऱ्या सुनील व निरूपमा देशपांडे या दाम्पत्याने नजीकच्या कोठा या गावात ‘ग्राम ज्ञानपीठ’ साकारले आहे. या ज्ञानपीठाचे लोकार्पण २९ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. सुनील व निरूपमा देशपांडे यांनी मेळघाटमधील कुपोषणाच्या कारणांचा बारकाईने अभ्यास केला. स्थानिक कारागिरांमधील अभिजात कलागुणांना चालना दिल्यास कुपोषणाची सस्या दूर होऊ शकते, असा निष्कर्ष त्यांनी काढला. याच निष्कर्षाला मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी मेळघाटातील कारागिरांची कला जोपासण्यासाठी व त्यांना चालना देण्यासाठी ग्राम ज्ञानपीठ निर्माण करण्याचा संकल्प केला. सद्यस्थितीत या दाम्पत्याच्या स्वप्नांना मूर्तरूप मिळाले आहे. धारणीपासून २५ किलोमिटर अंतरावर संपूर्ण बांबू केंद्राने लोकसहभागातून बोरी व कोठा गावादरम्यान ८ एकर जमीन खरेदी केली. या जागेवर आता भव्य असे ग्राम ज्ञानपीठ साकारले आहे. या ज्ञानपीठात स्वागत कक्ष, संग्रहालय, प्रार्थनास्थळ, गुरूकूल, अतिथी निवास, कारागिर हाट, खुला रंगमंच, जल व्यवस्थापन व वृक्षारोपण केले गेले आहे. या सर्व कामावर जवळपास एक कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा सर्व खर्च कोणताही शासकीय निधी न घेता केवळ लोकसहभागातून करण्यात येत आहे. यासाठी हे दाम्पत्य आर्थिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आले आहे. २९ जानेवारीला उदघाटन होणार असल्याने संपूर्ण बांबू केंद्राची चमू रात्रंदिवस ग्राम ज्ञानपीठाची निर्मिती करण्यात व्यस्त आहे. आता तयारी अंतिम टप्प्यात आहे. यात ९ गुरूकुलांची निर्मिती लोखंड, पितळ, काष्ठ, बांबू, माती, चामडे, विणकर, कृषी व लोककला जपणाऱ्या कारागिरांसाठी केली जात आहे. यामुळे लोप पावत असलेले ग्रामीण स्तरावरील कारागरि व त्यांच्या कौशल्याने ग्राम ज्ञानपीठाच्या माध्यमातून जतन करण्यात येणार आहे. या कामाला जनसहयोग मिळावा, अशी अपेक्षा देशपांडे दाम्पत्याने व्यक्त केली आहे.
कोठा येथे साकारले ग्राम ज्ञानपीठ !
By admin | Published: January 21, 2016 12:32 AM