दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण, अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य आरापी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा ८५ दिवसांपासून कारागृहातच गजाआड आहे. त्याचा नुकताच अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केला, हे विशेष.
विनोद शिवकुमार हा येथील मध्यवर्ती कारागृहात १ एप्रिलपासून न्यायालयाच्या आदेशाने जेरबंद आहे. कारागृहात येण्यापूर्वी त्याची ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली. प्रारंभी १५ दिवस तात्पुरत्या कारागृहात मुक्काम त्यानंतर मध्यवर्ती कारागृहाच्या स्वंतत्र बराकीत ठेवण्यात आले. एकत्रित बंदीजनांसोबत विनोद शिवकुमार याला बंदिस्त ठेवू नये, असा पोलिसांचा गोपनीय अहवाल होता. त्यानुसार कारागृह प्रशासनाने अंमलबजावणी केली. १ एप्रिल ते २४ जून या दरम्यान गत ८५ दिवसांपासून विनोद शिवकुमार हा गजाआड आहे. मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज नामंजूर करताना जिल्हा सत्र न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वकिलांमार्फत अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला. मात्र, हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आता विनोद शिवकुमार याला पुन्हा जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे वास्तव आहे. विनोद हा आयएफएस अधिकारी आहे. परंतु, गत ८५ दिवसांपासून जामिनाअभावी तो गजाआडच आहे.
--------------------
ना कुणाची भेट, ना कुणाशी थेट संवाद
विनोद शिवकुमार हा गत ८५ दिवसांपासून कारागृहात जेरबंद आहे. कोरोना नियमांच्या अटींमुळे कोणत्याही बंदिजनाला ना नातेवाईक, ना थेट संवाद साधता येत. हीच नियमावली विनोद यालाही लागू आहे. दोनदा जामिनासाठी वकिलपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत त्याला ना नातेवाईक, मित्र अथवा आप्तस्वकीयांचा चेहराही बघता आला नाही. नियमानुसार कारागृहाच्या फोनवरून आठवड्यातून एकदा नातेवाईंकासोबत त्याचे बोलणे होते.