दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा लोगो घेणे
-----------------------------------------------------------------------------------------------
उच्च न्यायालयाने दिली परवानगी, १६ जूनला सुनावणी
परतवाडा (अमरावती) : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामिनासाठी त्यांच्या वकिलामार्फत सोमवारी अचलपूर येथील न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर १६ जून रोजी प्रथम तदर्थ व सत्र न्यायाधीश एस.के. मुंगीलवार यांच्या न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे
अचलपूर येथील जेएमएफसी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यामुळे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमार याने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील जामीन अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्याचे वकील दीपक वाधवानी यांनी सोमवारी अचलपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. यासाठी त्यांना उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. नागपूर येथे या प्रकरणावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली होती. विनोद शिवकुमारतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप आहे. चव्हाण यांनी मृत्युपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी हेदेखील आरोपी आहेत. उच्च न्यायालयाने त्यांंना अंतरिम जामीन दिला आहे.
बॉक्स
१६ ला से आणि सुनावणी
अचलपूर न्यायालयाने १६ जून रोजी आरोपी विनोद शिवकुमार याच्या जामिनावर सरकारी पक्षाला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला आहे. त्याच दिवशी पहिले सत्र व तदर्थ न्यायाधीश एस.के. मुंगीलवार यांच्या न्यायालयात जामिनावर चर्चा झाल्यावर सुनावणी होण्याची शक्यता विधिसूत्रांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.