परतवाडा : वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित आरोपी उपवन संरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामिनावर सरकारी पक्षाच्या वतीने सोमवारी पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीलवार यांच्या न्यायालयात से दाखल करण्यात आला. त्यावर २२ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
गुगामल वन्यजीव विभागाअंतर्गत हरिसाल वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत विनोद शिवकुमार याच्यावर गंभीर आरोप केले होते. विनोद शिवकुमार पळून जात असताना नागपूर रेल्वे स्थानकावर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला धारणी न्यायालयात हजर केले असता दोन वेळा प्रत्येकी दोन आणि एक अशी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर ३० मार्चपासून तो न्यायालयीन कोठडीअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. विनोद शिवकुमारने त्याच्या वकिलातर्फे अचलपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने तपास अधिकारी तथा सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी १५ एप्रिल ही तारीख ठेवली होती. परंतु न्यायालयाला सुट्ट्या आल्यामुळे १९ एप्रिल ठेवण्यात आली. १९ एप्रिल रोजी अचलपूर न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता भोला चव्हाण व तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुनम चव्हाण यांनी न्यायाधीश एस. के. मुंगीलवार यांच्या न्यायालयात से दाखल केला.