राज्याच्या मुख्य सचिवांच्या नावे शो-कॉज, श्रीनिवास रेड्डीकडून मात्र शिवकुमार याची पाठराखण
अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने सन- २०१७ मध्ये उत्तरप्रदेशातील एका आयएएस महिलेला फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकली होती. याप्रकरणी भारतीय प्रशासकीय सेवा असोसिएशनने राज्याच्या मुख्य सचिवांना शो-कॉज बजावली होती. मात्र, त्यावेळी सुद्धा निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याने शिवकुमार याचीच पाठराखण केली.
गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांचे मेळघाटातील कारनामे आणि किस्से हादरवून टाकणारे आहेत. मेळघाटात रुजू होताच त्याने फेसबूकवरून एका आयएएस महिलेला अश्लील पोस्ट व अपशब्दांचा वापर केल्याची बाब निदर्शनास आली होती. आयएएस महिला अधिकाऱ्यांना अशाप्रकारे पोस्ट टाकल्याप्रकरणी आयएएस असोसिएशनने राज्याच्या मुख्य सचिवांना शो-कॉज बजावली होती. त्यानंतर शासनाने याबाबत खुलासा मागितला होता. पंरतु, जबाबदार अधिकारी म्हणून एम.एस. रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याच्या सेवापुस्तिकेत तशी नोंद करणे बंधनकारक असताना विनोद शिवकुमार याला केवळ वाॅर्निंग दिली आणि त्याच्याकडून ‘आय एम सॉरी’ अशी पोस्ट पुन्हा फेसबुकवर टाकून त्याला दोषमुक्त करण्याचा प्रताप केला. तेव्हापासूनच विनोद शिवकुमार याचे मेळघाटात गुंडाराज सुरू झाले. गुगामल वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात शिवकुमार याचे रात्री-अपरात्री दारू पिऊन धिंगाणा घालणे. अधिनस्थ अधिकारी-कर्मचारी यांना शिवीगाळ करणे, महिला कर्मचाऱ्यांची असभ्य वर्तणूक अशा एक ना अनेक तक्रारी एम.एस. रेड्डी यांच्याकडे होत्या. मात्र, आयएफएस लॉबी कशी सुरक्षित राहील, याचे प्लॅनिंग रेड्डी याने केले. त्यामुळेच दीपाली या निष्पाप महिला अधिकाऱ्यांचा बळी गेला, हे विशेष.
--------------
वनमजुरांना मारहाणीचे प्रकरण दडपले
विनोद शिवकुमार याच्या दहशतीने वनमजूर, वनरक्षक हैराण झाले होते. आठ तासांचे कर्तव्य असताना १२ ते १५ तास तो काम करण्यास मजुरांना भाग पाडायचा. दारूच्या नशेत बेधूंद झाल्यानंतर जे हाती मिळेल त्या वस्स्तूने तो वनमजुरांना मारायचा. अशाचप्रकारे अपंग वनमजूर बेठेकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी समितीमार्फत चौकशी झाली. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही रेड्डी याने कारवाई न करता विनोद शिवकुमार याला पाठीशी घातले आणि वनमजुरांचे मारहाण प्रकरण दडपले. तसेच तारूबांदा येथील एका वनमजुराला मारहाणप्रकरणी पुन्हा तेच झाले.