सदस्याचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारअंजनगाव सुर्जी : चिंचोली बु. येथील पोट निवडणूक अविरोध झाली असली तरी अधिकृत घोषणेपूर्वी ग्रामपंचायतीच्या इमारतीवर विजयी झालेल्या उमेदवारांचे छायाचित्र बॅनरवर प्रसिध्द झाल्याने आदर्श आचारसहितेचा भंग झाल्याचा ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. संबंधित सदस्यांना अपात्र घोषीत करुन या प्रकाराला चालना देणाऱ्या ग्रामसचिवाला निलंबित करावे, अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.पोटनिवडणूकीत चार जागासाठी ठरविण्यात आलेल्या निवडप्रक्रियेत विरोधकांनी माघार घेतल्याने चंद्रशेखर घोगरे, सुनील गवळी, शुभांगी गुऱ्हेकर, शोभा सोनोने हे चार उमेदवार बिनविरोध झाले. शुक्रवार २१ ला जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु या चार सदस्यांनी ग्रामसचिव शितल सोनार यांना हाताशी घेऊन १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त ग्रामवासियांना शुभेच्छा देण्याचे बॅनर ग्रामपंचायतच्या प्रशासकीय इमारतीवर लावले व त्यावर पदाची रितसर घोषणा होण्यापूर्वीच छायाचित्राखाली पदाचा उल्लेख केला. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन करणे उमेदवारांना बंधनकारक असतांना येथे मात्र आचार संहितेचा भंग करण्यात आला. त्यामुळे या चार विजयी उमेदवारांना अपात्र करावे तथा ग्रामसचिवाला निलंबित करावे, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य चेतन घोगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
चिंचोली पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग
By admin | Published: April 24, 2016 12:02 AM