---------------
तिवसा ठाण्याच्या हद्दीत ग्रामसुरक्षा दल
अमरावती : या काळात चोऱ्या व घरफोड्या वाढल्याने तिवसा पोलिसांच्या मार्गदर्शनात गावागावांत ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आलेले आहे. सुरवाडी, तिवसा, पंचवटी, गुरुदेवनगर, सातरगाव आदी गावांत चोरीच्या घटना घडल्या आहेत.
-------------------------
महापौरांद्वारा आवास योजनेचा आढावा
अमरावती : महापालिका क्षेत्रातील रखडलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील ३६० घरकुलांचा आढावा महापौर चेतन गावंडे यांनी घेतला. या विभागाला त्रुटीच्या पूर्ततेसाठी निर्देश देण्यात आलेले आहे. बैठकीला अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------
जिल्ह्यातील बसस्थानक पडले ओस
अमरावती : संचारबंदीच्या सुधारित आदेशात केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एसटी प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील बसस्थानक आता ओस पडल्याचे दिसून येत आहे.
---------------------
शेतशिवारात आता कांदा काढणीचे काम
अमरावती : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आता कांदा काढणीचे काम जोरात सुरू आहे. यामुळे अनेक हातांना काम मिळाले. मागील दोन महिन्यांत झालेल्या अवकाळीने पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना शासन मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
---------------------
कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ वेतन द्या
अमरावती : महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी पूर्णवेळ काम करीत असताना त्यांना अर्धवेतन देण्यात येते. त्यामुळे या सर्वांना पूर्णवेळ काम, पूर्णवेळ वेतन देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे केली आहे.
-----------------------
उपमहापौरांनी केली लसीकरण केंद्राची पाहणी
अमरावती : उपमहापौर कुसूम साहू व उपायुक्त रवि पवार यांनी शुक्रवारी छत्रसालगंज येथील कोरोना लसीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे उपस्थित होते.
---------------
सहा गावांचे पाणी टँकरचे प्रस्ताव
अमरावती : एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागल्याने सहा गावांना आता टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये एकझिरा, लवादा, आकी, सावंगी मग्रापूर या गावांचा समावेश आहे. याशिवाय ३१ गावांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.
-----------------
कोरोना तपासणी नमुन्यांमध्ये २२ टक्के पॉझिटिव्हिटी
अमरावती : जिल्ह्यात रविवारी ३,१५५ अहवालांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२ टक्के अशी पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्रिसूत्रीचे पालन होणे महत्त्वाचे आहे.
------------------
रविवारी ५३४ जणांना डिस्चार्ज
अमरावती : जिल्ह्यात रविवारी ५३४ जणांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आतापर्यंंत ५३,८५८ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. ही टक्केवारी ८८.०५ असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात नमूद आहे.
----------
रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दुपटीचा कालावधी आता ११४ दिवसांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यांपासून रुग्णसंख्या वाढल्याने २०० दिवसांवर गेलेला कालावधी आता कमी आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
--------------------------
कोरोनाचा मृत्यूदर आता १.४४ टक्क्यांवर
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे उपचारादरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाणात वाढलेले आहे. अलीकडे रोज २० हून अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण १.४४ टक्क्यांवर आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.