लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संचारबंदी असतानाही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौकातील त्यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांसह अभिवादन करण्यास आलेल्या आमदार रवि राणांसह पाच जणांवर जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंविच्या कलम १८८ व सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी इर्विन चौकात घडली. गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके यांनी यासंदर्भात फिर्याद नोंदविली आहे.पोलीसूत्रानुसार, यातील आरोपी आमदार रवि राणा व पाच इसम पांढऱ्या रंगाच्या वाहन क्रमांक एमएच २७-बीव्ही ०१ मधूून उतरले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जात असताना फियार्दी उपनिरीक्षकांनी त्यांना हटकले असता, त्यांनी आम्ही दर्शन घेण्याकरिता आलो आहे, असे सांगण्यात आले. सध्या संचारबंदी असल्याने त्यांना मनाई केली असतानाही त्यांनी जुमानले नाही. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करून त्या ठिकाणी गेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा त्यांच्याविरुद्ध सदर नोंदविला आहे.
कलम १४४ लागू आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येत नाही. संचारबंदीचे व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन आमदारांसह कार्यकर्त्यांनी केल्यामुळे सदर गुन्हा नोंदविला.- मनीष ठाकरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर