फोटो - पी चांदूर बी १२
ग्रामीण रुग्णालयात रांगेत लागण्याची चढाओढ, रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ नियोजनाचा परिणाम
चांदूर बाजार : येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर मंगळवारी रांगेत आधी लागण्याच्या वादात दोन जेष्ठ नागरिकांमध्ये हाणामारी झाली. अखेर पोलिसांना पाचारण करून त्यांचा उपस्थितीत लसीकरण करण्यात आले. या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे सातत्याने ग्रामीण रुग्णालय प्रशासन चर्चेत आहे. परिणामी लसीकरण करण्यास आलेल्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हापासून बचावासाठी मंडप व खुर्च्यांची व्यवस्था तसेच नागरिकांना सुविधा देण्याच्या खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लसीचा पहिला डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचीही लसीकरण केंद्रावर संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना पहिली लस घेऊन दोन महिने झाले. त्यांना दुसरी लस घेणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे सकाळी ५ पासूनच ते रांगा लावून लसीकरण केंद्रावर उभे असतात, तर आरोग्य अधिकारी व कर्मचारी सकाळी ९ ला हजर होतात. ११ मे रोजी सुरुवातीला लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या रांगेतील क्रमांकानुसार यादी तयार करण्यात आली. कुणी तरी ड्रॉची कल्पना काढली. त्यात आपल्या नावाच्या चिठ्या टाकण्यास सांगण्यात आले. यातून ज्यांच्या नावाची चिठ्ठी निघेल, त्यांनाच लस देण्यात येईल, असे सांगण्यात आले. यात दुसरा डोज असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
परंतु डब्यात चिठ्ठ्या टाकताना पहिल्या व दुसरा डोस असलेल्या नागरिकांनी एकाच वेळी चिठ्ठ्या टाकल्या. यादीनुसार क्रमवारीने आलेल्यांची नावे बाद झाल्याने गोंधळाला सुरुवात झालीय. परिणामी पोलिसांना पाचारण करावे लागले. लसीकरण करिता आलेले ज्येष्ठ नागरिक काही काळ पोलिसांनाही जुमानले नाही. अखेर यादीप्रमाणे क्रमांकानुसार टोकन देऊन लसीकरण करण्यात यावे, असे ठरले. त्यानुसार नाव व टोकन क्रमांक पाहूनच पोलिसांनी लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना क्रमवारीने सोडले. शासनस्तरावरून लस उपलब्ध होण्यास तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत आहे. हे मान्य असले तरी ज्येष्ठ नागरिकांना सुसह्य होईल, अशी व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी लावली जावी, अशा प्रतिक्रिया यानिमित्त उमटल्या.
कोट
लसीकरण केंद्रावर पोलीस शिपायांची नियमित नियुक्ती केली आहे. गोंधळ होत असल्याचे पाहताच त्यांनी हस्तक्षेप करून लसीकरण सुरळीत केले. -
सुनील किनगे, ठाणेदार, चांदूर बाजार