अमरावती : मतीमंद तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक ५ पी. एन. राव यांनी २ डिसेंबर रोजी हा निर्णय दिला. गजानन सुदाम सरकटे (३२, रा. नारगावंडी, ता. धामणगाव रेल्वे) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. १६ सप्टेंबर २०२० रोजी धामणगाव रेल्वे तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती.
पीडित मतिमंद तरुणी ही तिच्या आईसमवेत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान सायंकाळी तिचा शोध घेतला असता, एका घराच्या मागे ती रडताना दिसून आली. तिच्यावर अत्याचार झाल्याचे दिसून आले. पीडिताने इशाऱ्याने आरोपी गजानन सरकटे याने तिच्यावर अत्याचार केल्याचे आईला सांगितले. याप्रकरणी पीडिताच्या आईच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकटे व उपनिरीक्षक द्वारका अनभोरे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनुप्रीती ढवळे यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पीडिता, वैद्यकीय अधिकारी व अन्य साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली तथा पीडितेला मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत करण्याचे आदेश विधी सेवा प्राधिकरणास दिले. पैरवी अधिकारी म्हणून नाईक कॉन्स्टेबल गजानन नागे, सहायक उपनिरीक्षक राजू उईके व जमादार अरुण हटवार यांनी काम पाहिले.