सर्वच १८ संचालक विजयी : परिवर्तन पॅनेलचा सफायाचांदूररेल्वे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीतील उमेदवारांची मतमोजणी बुधवारी पार पडली. यामध्ये सर्वच १८ संचालक काँग्रेसप्रणित आ. वीरेंद्र जगताप यांच्या समता पॅनेलचे विजयी झालेत. १५ वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखण्यात या गटाला यश आले आहे. या बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-राकाँ यांनी एकत्र येऊन परिवर्तन पॅनेल तयार केला आहे. या पॅनेलचे नेतृत्व माजी आ. अरुण अडसड व दिलीप गिरासे यांचेकडे होते. या बाजार समितीच्या निवडणुकीत काही ज्येष्ठ सहकार नेत्यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने सेवा सहकारी, ग्रामपंचायत, व्यापारी मतदारसंघात एकास एक अशी सरळ लढत होती. यामुळे निवडणुकीत काय होणार व कोणाच्या बाजूने निकाल लागणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी के.पी. धोपे यांच्या उपस्थितीत आनंदराव सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. हमाल व मोपारी मतदारसंघात प्रदीप गोविंदराव गुजर १९ मते घेऊन विजयी झाले. व्यापारी व अडते मतदारसंघात दिलीप मुंधडा, राजकुमार जालान विजयी झालेत. ग्रामपंचायत मतदारसंघात रविकांत देशमुख, वैशाली ठाकरे विजयी झाल्यात. अनुसूचित अनु. जमाती मतदारसंघात हरिभाऊ गवई, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघात भानुदास गावंडे विजयी झालेत. सेवा सहकारी कृषी पत संस्था मतदारसंघात अशोक चौधरी, प्रदीप वाघ, रवींद्र देशमुख, प्रभाकरराव वाघ, प्रदीप रामराव जगताप, अतुल चांडक, मंगेश धावडे हे उमेदवार विजयी झालेत. महिला राखीव मतदारसंघात सुनीता विनोद काळमेघ, सविता अनिल देशमुख व इतर मागासवर्ग मतदारसंघात प्रवीण घुईखेडकर, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात रमेश महात्मे विजयी झालेत. मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त होता. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती के.पी. धोपे यांच्या मार्गदर्शनात कावडकर, लेंदे, दहीकर, गायकवाड, वाघमारे यांनी चोख व्यवस्था सांभाळल्याने मतमोजणी शांततेत पार पडली. सर्वच १८ जागांवर विजय संपादन केल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत शहरातून फटाक्याच्या आतषबाजीत धडक मिरवणूक काढण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
चांदूररेल्वे बाजार समितीवर वीरेंद्र जगताप गटाचे वर्चस्व
By admin | Published: August 21, 2015 12:46 AM