अमरावती : कोरोना संसर्गाचे काही रुग्णाला अलीकडे जुन्या लक्षणासह निद्रानाशही जडलेला दिसून आलेला आहे. याशिवाय तोंडाला फक्त खारट चव जानवणे यामुळेही काही रुग्ण त्रस्त आहेत. अनेक रुग्णांमध्ये विषाणू जास्त काळ टिकून राहिल्याचेही निरीक्षण आहे. ‘डबल म्युटेशन’झाल्याने कोरोनाचा विषाणू असा रंग बदलत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पीकमध्ये अनेक रुग्णांना फुफ्फुसाचा संसर्ग झालेला आहे. अनेकांचा एचआरसीटी स्कोर २० चे दरम्यान राहिलेला आहे. नव्या विषाणूमुळे हा त्रास उद्भवत आहे की कसे, याविषयी डॉक्टरांचे अद्याप एकमत नाही. काहींच्या मते लक्षणे अंगावर काढल्याने फुफ्फुसांमध्ये संसर्ग वाढलेला आहे. मात्र, याकाळात एचआरटीसी चाचण्यांच्या दरात काहींनी चांगलेच उखळ पांढरे करून घेतलेे आहे. काही रुग्णाला त्रास असल्याने, तर बहुतेक रुग्णांना कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचण्यांऐवजी या प्रकारातील महागड्या चाचण्या करायला लावल्याचेही प्रकार घडले आहेत.
जिल्ह्यात चार प्रकारातील प्रत्येकी २५ नमुने पुणे येथील ‘एनआयव्ही’ला जनुकीय क्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासणी पाठविले होते. त्याचा अहवाल ‘आयसीएमआर’ला पाठविण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य यंत्रणेतील एकही अधिकारी याविषयी बोलावयास तयार नाही. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने नव्या प्रकारातील विषाणूमध्ये डबल म्युटेशन (दुहेरी उत्परिवर्तन) आढळून आल्याचे स्पष्ट केले. ‘ई ४८४ क्यू’ व ‘एल ४५२ आर’ अशा प्रकारचे म्युटेशन आढळल्याचे सांगण्यात आले. विषाणूमधील ‘एस-स्पाईक’ प्रोटिनमध्ये बदल होतात व हे विषाणू शरीरातील पेशींना घट्ट चिपकत असल्याने विषाणू अधिक काळ शरीरात टिकतो व यामुळे संक्रमणाचा वेगही वाढत असल्याचे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
हा तर ‘सायटोकाईन स्टार्म’चा प्रकार
अनेक रुग्ण अंगावर दुखणे काढतात. त्यामुळे एचआरसीटी स्कोर वाढल्याचे दिसून येते. अनेकांचा स्कोर १२ पर्यंत सहा ते आठ दिवसांपर्यंत राहिल्याचे निरीक्षण आहे. प्रत्येकाची तब्येत ही सारखी नसते. त्यामुळे रिकव्हरीमध्येही फरक पडतो, हा एक प्रकारे ‘सायटोकाईन स्टार्म’चा प्रकार असल्याचे श्वसन विकारतज्ज्ञ अनिल रोहनकर यांनी सांगितले. यात ‘डेथ रेट’ ३० ते ४० टक्क्यांवर जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
संसर्गाची ही लक्षणे नव्याने
काहींना अलीकडे निद्रानाश व तोंडाला फक्त खारट चव जाणवत आहे. याशिवाय डोळे लाल होणे किंवा डोळे येणे, अंगाला खाज, पुरळ येणे, हाता-पायांच्या नखांचा रंग बदलणे, घसादुखी, अंगदुखी, अतिसार, ही कोरोना संसर्गाची नवे लक्षणे आहेत. याशिवाय ताप, सर्दी, खोकला, तोंडाची चव जाणे, गंध न समजणे, जुलाब ही जुनी लक्षणेदेखील असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.
कोट
रुग्ण फिजिकली ॲक्टिव्ह असतात. नुसते बसून राहिल्यानेही काही रुग्णांना निद्रानाश जडावते. तोंडाला चव नसणे किंवा एकच चव जाणवत राहणे, असे काही रुग्णांना होते. सायटोकाईन स्टार्ममुळे काही रुग्णांचा स्कोर वाढल्याचे दिसून आलेले आहे. या प्रकारात डेथ रेट जास्त राहतो.
- डॉ अनिल रोहनकर,
श्वसनविकार तज्ज्ञ, जिल्हाध्यक्ष, आयएमए
कोट
काही रुग्णाला निद्रानाश जडावण्याची अनेक कारणे आहेत. आयसीयूमध्ये अनेकांना हा त्रास झालेला आहे. चव नसने किंवा एखादी चव जाणवत राहणे ही लक्षणे आहेत. याशिवाय काही नवीन लक्षणेदेखील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये आढळून आलेली आहेत.
- डॉ. श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक