शेंदुरजना खुर्द गावात दिले दर्शन
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : ग्राम विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आढावा घेण्यासाठी तब्बल २९ सदस्य आणि खासदारासह निघालेल्या केंद्रीय सदस्य समितीचा दौरा धामणगाव तालुक्यासाठी फार्स ठरला आहे. शेंदूरजना खुर्द येथे दर्शन देऊन महामार्गावरील १२ गावांमधून या समितीची वाहने सुसाट वेगाने निघून गेली.
केंद्र शासनाने घरकुल, एमआरजीएस, बचत गट तसेच केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कितपत होते, यासाठी संसदीय समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांमधील निवडक खासदारांची समिती जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये आढावा घेण्यासाठी पाठविली होती. सदर समितीने अमरावती दर्यापूर अचलपूर तिवसा, वरूड तालुक्यात दौरा केला. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये बुधवारी संयुक्त बैठक घेतली. सदर समितीने धामणगाव तालुक्यातील हद्दीत दुपारी ४ वाजता आगमन केले. शेंदुरजना खुर्द येथे स्मशानभूमी येथे भेट दिली. मात्र, या महामार्गावर येणारे तळेगाव दशासर, देवगाव, नागापूर, उसळगव्हाण, बोरवघड, भातकुली रेणुकापूर, रायपूर कासारखेडा, बोरगाव धांदे, विटाळा या रस्त्यावरील एका गावात भेटी दिली नाही. संसदीय समितीतील तब्बल चाळीस वाहने वर्धा जिल्ह्याकडे भरधाव निघून गेली. तालुक्यातील महसूल पंचायत इतर विभागातील अधिकारी या समितीच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे होते, हे विशेष.
धामणगाव तालुक्यात भातकुली, बोरवघड तसेच या भागातील अनेक गावांमध्ये गत वर्षात केंद्र शासनाच्या अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकाने भ्रष्टाचार केला असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, या समितीने भेट दिली नसल्याने झालेल्या त्यावर पांघरूण घातले गेल्याची चर्चा या भागात आहे.