सिंधुताई सपकाळांचे तरुणाईला आवाहनअमरावती : नीती, माती आणि संस्कृतीचा मिलाफ असलेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रानेच देशाला घडविले. घडविण्याची प्रक्रिया मतदानातून साधली जाते. म्हणून राज्यातील युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे प्रतिपादन सिंधूताई सपकाळ यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सोमवारी आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्र्रे, कुलगुरु मोहन खेडकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सहायक पोलीस आयुक्त नितीन पवार, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार उपस्थित होते. यावेळी आपल्या ओघवत्या शैलीतून आणि करारी आवाजातून मार्गदर्शन करताना सिंधूताई सपकाळ यांनी उपस्थिताना मोहित केले. ‘मी केवळ १५ मिनिटे बोलणार असून मी ठोकपीट करणार आहे’ या शब्दातून सिंधुतार्इंनी त्यांच्या दणकेबाज भाषणास सुरूवात केली. राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व सांगताना सिंधूतार्इंनी तरूणांना मतदार नोंदणी कार्यक्रमाकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले. तरूणींवर तुम्ही प्रेम करता. त्यासाठी वाटेल ते करण्यास तयार करता. मात्र, जीवाचे रान करून तुम्हाला सुख-सुविधा पुरविणाऱ्या पालकांपासून नवीन पिढी दूर जाते आहे, दरी वाढते आहे, ती दरी कमी करा, असा सल्ला सिंधूतार्इंनी विद्यार्थ्यांना दिला. आई-वडिल मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी जीवनभर झटत असतात, त्यांच्या वेदना समजून घेत चला, असा सल्ला सिंधूताईनी विद्यार्थ्यांना दिला. संकटांवर पाय ठेऊन उभे रहा. संकटांची उंची कमी होते.तरूणाईच्या खांद्यावर देशाची धुरा आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत तरूणांचा सहभाग अनिवार्य ठरतो, तरूणांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असा आग्रह त्यांनी धरला. सादर केलेल्या कवितांनी सामाजिक भान जपण्याचा संदेश उपस्थितांना दिला. अवघे वातावरण भारावून गेले होते. संचालन व आभार प्रदर्शन जनसपर्क अधिकारी विलास नांदुरकर, प्रास्तविक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. कर्तबगार अधिकाऱ्यांचा सत्कारनिवडणूक प्रक्रियेमध्ये उत्तम कार्य करणारे केंद्र्रस्तरीय अधिकारी मकरंद खेडकर, पी.जे. सावरकर, वनमाला भास्कर, शालिनी पटिले, संजय पातुर्डेकर, संजय मोदी, सोनपरोते, ठाकरे, एस.के. घाटोळे यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. निवडणूक नोंदणी अधिकारी ३८-अ अमरावती विधानसभा प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
देश घडविण्यासाठी मतदान करा !
By admin | Published: January 26, 2016 12:06 AM