विद्यापीठाचा पुढाकार : मुंबईत २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाची बैठकअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ४२० महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी केली जाणार आहे. त्याकरिता विद्यापीठ पुढाकार घेणार असून राज्य निवडणूक आयोगाने २९ एप्रिल रोजी बोलविलेल्या बैठकीत यासंदर्भात दिशा ठरविली जाणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.ए. सहारिया यांनी वयाचे १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकाने मतदार नोंदणी करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने इयत्ता १२ वी नंतर प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतदारनोंदणीसाठी प्राचार्य, प्राध्यापक आदींना पुढाकार घ्यावा लागणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदारनोंदणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी बैठक घेऊन याबाबत काही सूचना दिल्या आहेत. मात्र, अंतिम निर्णय येत्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या बैठकीतून होईल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यासाठी पुढाकार घेणार असून ही जबाबदारी विद्यार्थी कल्याण विभागाकडे सोपविली जाणार असल्याचे संकेत आहेत. तसेच मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु राज्य निवडणूक आयुक्त जे.ए. सहारिया यांनी मतदार नोंदणी अभियान हे महाविद्यालय स्तरावरून राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यासाठी कृती आराखडा तयार करीत आहे.
आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी
By admin | Published: April 09, 2016 12:03 AM