अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बांबूवर पांढऱ्या कापडासह मातीचे मडके उलटे लटकवून अमरावती लोकसभा मतदारसंघातील शाळा- शाळांमधून ही मतदानाची गुढी उभारली जात आहे. गुढीपाडवा ६ एप्रिलला आहे. पण, ही मतदानाची गुढी शुक्रवार, ५ वा सोमवार ८ एप्रिलला शाळेत उभारून प्रति गुढीपाडवा उत्सव साजरा करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. ‘चुनावी पाठशाला’ उपक्रमांतर्गत ही गुढी मुख्याध्यापकांना उभारायची आहे.गुढीकरिता आवश्यक मातीच्या मडक्यावर शाळेतील कलाशिक्षक किंवा चित्रकला अवगत असलेल्या शिक्षकाला ‘लोकसभा इलेक्शन-२०१९ देश का महात्यौहार’चा निर्धारित लोगो साकारायची आहे.मातीचे मडके शक्य नसल्यास पांढऱ्या कापडावर महात्यौहारचा लोगो काढून बांबूच्या सहाय्याने मडकेविरहीत पांढºया कापडाची गुढी उभारण्याची मुभा मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. ही गुढी शाळा संपण्याच्या वेळी मुख्याध्यापकांना खाली काढायची आहे. गुढी उभारताना निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, याची काळजीदेखील मुख्याध्यापकांना घ्यावयाची आहे.गुढी पाडव्यातील गुढीला तांब्याचे भांडे, नवीन रंगीत आकर्षक कापड, भरजरीची साडी किंवा शालू, आंबा व कडूनिंबाची डेहाळी आणि होळीच्या गाठीचा मान आहे. हे सर्व असल्यावरच ती गुढी पूर्णत्वास जाते. गुढी शब्द सार्थकी ठरतो. सूर्योदयाला उभारली जाणारी ही गुढी सूर्यास्तादरम्यान उतरविली जाते. याउलट बांबूच्या काठीवर पांढरे कापड अन् मातीचे मडके उलटे लटकवून उभे करण्याच्या उपक्रमात गुढी हा शब्द सार्थकी ठरत नाही. याला गुढी शब्द जोडणे योग्य नाही, तर गुढी हिंदू उभारतात. यामुळे यातील गुढी शब्दच आचारसंहितेचा भंग ठरवित असल्याचा प्रतिप्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, अनेक शाळांमध्ये चित्रकला शिक्षक नाहीत. चित्रकलेची जाण असली तरी हुबेहूब चित्र उतरविण्याची कला अवगत असलेले शिक्षक बोटावर मोजण्याइतपत आहेत. यात महात्यौहारचा लोगो कोण साकारणार, ही समस्या उभी ठाकली आहे.
अमरावती जिल्ह्यात उभारली मतदानाची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 1:37 PM