अमरावती : वनविभागाचे वडाळी येथील बांबू गार्डन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून बंद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बांबू गार्डन समितीची सोमवारी बैठक होऊ घातली असून, यात गार्डन कधीपर्यंत बंद असेल, याविषयी निर्णय होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोविड-१९ च्या उपाययाेजनांसाठी जारी केलेल्या आदेशाची वनविभागाने अंमलबजवाणी आरंभली आहे. बांबू गार्डन बंदमुळे वनविभागाला महिन्याकाठी १० लाखांच्या उत्पन्नाचा फटका बसणार आहे.
लॉकडाऊननंतर बांबू गार्डन २३ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले. पर्यटक, निसर्गप्रेमी, अमरावतीकरांनी बांबू गार्डन सुरू होताच प्रचंड प्रतिसाद नाेंदविला. विशेषत: कुटुंबीयांसह मौजमजा करण्यासाठी रविवारी बांबू गार्डनमध्ये कमालीची गर्दी उसळत आहे. मात्र, फेब्रुवारीत कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी वन विभागाने तत्क्षण रविवारपासून बांबू गार्डन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक बांबू गार्डन बंद करण्यात आल्याने रविवारी पर्यटक, नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले, हे विशेष.
---------------
गार्डन समितीची आज बैठक
बांबू गार्डन कधीपर्यंत बंद ठेवावे, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवारी गार्डन संरक्षण, संवर्धन समितीची बैठक होऊ घातली आहे. समितीचे अध्यक्ष उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, तर सदस्य सचिव वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आहेत. सदस्य म्हणून वनराईचे मधू घारड, शिक्षण सभापती आशिष गावंडे, नगरसेवक पंचफुला चव्हाण, सपना ठाकूर, जयंत वडतकर, चेतन भारती आदी उपस्थित राहून बांबू गार्डनविषयी निर्णय घेतील.
-------------
कोट
अलीकडे बांबू गार्डनमध्ये गर्दी वाढली आहे. कोरोना नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना असतानादेखील नागरिक ते करीत नाहीत. आता तर संक्रमितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजनांच्या अंमलबजवाणीसाठी आदेश जारी केला आहे. त्यामुळे बांबू गार्डन तूर्त बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी