बडनेरा : पतंजली ट्रस्टच्यावतीने प्रस्तावित ‘अन्न प्रक्रिया’ प्रकल्प साकारण्यासाठी बडनेऱ्यातील विजय मील, गोपालनगरातील सूतगिरणी तर नांदगाव पेठ एमआयडीसीसह एकूण तीन जागांची पाहणी पतंजलीचे आचार्य बालकृष्ण महाराज यांनी गुरुवारी केली. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीलाही त्यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. यावेळी आ.रवीे राणा उपस्थित होते. पतंजली ट्रस्टचे आचार्य बालकृष्ण महाराज मुंबईहून विशेष विमानाने बेलोरा विमानतळ येथे पोहोचले. ‘अन्न प्रक्रिया’ प्रकल्प उभारण्याकरिता प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी बालकृष्ण महाराज अमरावतीत आले होते. त्यानंतर याच प्रकल्पासाठी त्यांनी गोपालनगरातील ६२ एकरातील सूतगिरणीच्या जागेची चाचपणी केली. या परिसरात हा प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मालाला वाढू शकते. बडनेऱ्यातील यवतमाळ टी-पॉर्इंटवर बालकृष्ण महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विलास वाडेकर, नील निरवार, विजय नागपुरे, रामू कातोरे, संजय जयस्वाल, सुधीर लवणकार, मंगेश चव्हाण, अमोल मिलखे, शबाना जलील, रिजवान, रवी वानखडे आदी उपस्थित होते. पतंजलीने बाजार समितीतून करावी धान्याची खरेदी ४अमरावती बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन, तेलबिया व संत्र्याची आवक आहे. त्यामुळे पतंजलीद्वारा येथील धान्य खरेदी केल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल, असे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी बालकृष्ण महाराजांना सांगितले. यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.कृषी आधारित उद्योगाची निर्मिती करणार४बाजार समितीमध्ये फूडपार्क साकारण्यासंदर्भात आचार्य बालकृष्ण यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आ. रवी राणा, आ.आशिष देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) शंकर शिरसुद्धे, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रवीण ठाकरे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुळकर्णी उपस्थित होते. शेतकऱ्यांना भेटून त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची उत्पादने खरेदी करणे, अॅडव्हांस नर्सरी सुरू करणे, विदर्भात उद्योगाचे जाळे पसरविणे हे पतंजलीचे लक्ष्य असल्याचे बालकृष्ण महाराज यांनी सांगितले.
अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी जागांची पाहणी
By admin | Published: January 22, 2016 1:31 AM