गणेश वासनिक अमरावती : आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी प्रशासकीय बदलीला आव्हान देत ‘मॅट’मध्ये धाव घेतली. त्यानंतर २८ एप्रिल २०२३ रोजी वानखेडे यांच्या बदलीला ‘मॅट’ने स्थगनादेश दिला. आता याप्रकरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॅटने तारीख दिली असृून, राज्य शासनाकडून ‘से’ दाखल होण्याची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे एटीसींचा एकतर्फा पदभार स्वीकारणाऱ्या चंचल पाटील खुर्ची कधी मिळेल, यासाठी त्या ‘वेट ॲण्ड वॉच’ आहेत. हल्ली एटीसी पदाचा कारभार सुरेश वानखेडे सांभाळत आहेत.
सुरेश वानखेडे यांची प्रशासकीय कारणास्तव अचानक दीड वर्षातच यवतमाळ येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली. मात्र, या बदली आदेशाला वानखेडे यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले आणि २८ एप्रिल रोजी स्टेदेखील मिळविला. ‘मॅट’ने ३ मे रोजी तारखेवर सुनावणी घेतली असून, राज्य शासन, ट्रायबल आयुक्तांना ‘से’ दाखल करण्यासाठी नोटीस बजावल्याची माहिती आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ‘मॅट’मध्ये निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे की चंचल पाटील? याचा फैसला हाेणार आहे. मात्र, २८ एप्रिलपासून एटीसींचा संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे, हे विशेष.कोण आहेत चंचल पाटील?आदिवासी विकास विभागाने अमरावतीच्या अपर आयुक्तपदी चंचल पाटील यांची नियुक्ती केली आहे. पाटील या सातारा येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. २१ एप्रिल रोजी चंचल पाटील यांनी एटीसींचा पदभार स्वीकारला आणि तासाभरातच अमरावतीहून साताराकडे रवाना झाल्या होत्या. ‘मॅट’च्या स्थगनादेशामुळे पाटील यांना एटीसी पदाचा कारभार हाताळता येत नाही.