गजानन मोहोड
अमरावती : सर्वजन ज्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे त्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण असलेली लस आता १६ डिसेंबरपासून जिल्ह्यातील नऊ बुथवर हेल्थ केअर वर्कर्सला प्रत्यक्षात दिली जाणार आहे. यात जिल्हा शल्यचिकीत्सकांतर्गत पाच, जिल्हा परिषदेचे दोन व महापालिकेच्या दोन बुथवर प्रत्येकी १०० कोरोना वॉरिअर्सला ही लस दिली जाईल. शनिवारी सायंकाळच्या व्हिसीमध्ये तशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात पीडीएमसी व विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय केंद्रात, जिल्हा शल्य चिकित्सकांतर्गत नर्सिंग होस्टेल, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषदेचे अंजनगाव बारी व ०००० प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस दिली जाणार आहे. शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेतील हेल्थ केअर वर्करचे लसीकरण सुरुवातीच्या टप्प्यात होईल.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६,२२२ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. या सर्व व्यक्तिंची नोंदणी को-विन ॲपवर यापूर्वीच करण्यात आलेली आहे. नेमक्या किती व्हायलचा पुरवठा होईल, ते कुठून येणार याविषयी आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. मात्र, १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार असल्याचे सुतोवाच खूद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असल्याने याचे नियोजन युद्धस्तरावर सुरू झालेले आहे. यात कोणतीही त्रुटी येऊ नये, यासाठी शुक्रवारी महापालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत ड्राय रन घेण्यात आला. त्यात येणाऱ्या त्रुटी टाळून ही मोहीम सर्व स्तरावर यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची लगबग सुरू झालेली आहे. या सर्व बुथवर वैद्यकीय अधिकारी, लसीकरण अधिकारी, निरीक्षक व सुरक्षा रक्षक आदी सहा व्यक्तींचे पथक उपस्थित राहणार आहे.
बॉक्स
अशी असेल बुथची रचना
या नऊ बुथवर नोंदणी, लसीकरण व निरीक्षण कक्ष अशी रचना आहे. नोंदणी कक्षात माहितीची नोंद होईल, को-विन ॲपमध्ये व्यक्तींच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार लस घेणाऱ्या व्यक्तीला ओटीपी प्राप्त होईल. संबंधिताने नोंदणी कक्षात तो ओटीपी सांगताच इतर नोंदी घेण्यात येऊन लस दिली जाईल. त्यानंतर सर्व रुग्णांच्या मोबाईलवर पुढील लसीच्या तारखेची व वेळेची माहिती देण्यात येईल. लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास निरीक्षण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल.
बॉक्स
जिल्ह्यात चार टप्प्यात लसीकरण
चार टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर (शासकीय आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स), दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर (गृह, महसूल, होमगार्ड संबंधित अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी), तिसऱ्या टप्प्यात हायरिस्क व्यक्ती व ५० वर्षांवरील व्यक्ती व चौथ्या टप्प्यात उर्वरित सर्व व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील नोंदी घेतल्या जात आहेत.
बॉक्स
रियल टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचे
ड्राय रनमध्ये एका बुथवर पथकातील सदस्य १५ मिनिटे उशिरा पोहोचले होते. त्यामुळे प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी रियल टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे. याासोबतच सर्व प्रक्रिया ॲनलाईन राहणार असल्याने इंटरनेटचा खोळंबा येऊ नये, यासाठी डोंगल व हॉटस्पॉटचीदेखील सुविधा ठेवण्यात येणार आहे. ड्राय रनमधील त्रुटींची पुनरावृत्ती येथे टाळण्यात येणार आहे.
कोट
जिल्ह्यातील नऊ बुथवर १६ जानेवारीपासून कोेरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल. यादृष्टीने तयारी सुरू आहे. मोहीम किती दिवस चालेल, लस कोणती, कुठून येणार, याविषयीच्या गाईडलाईन अध्याप नाहीत.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक