नाफेडच्या केंद्रावरील स्थिती : वजनकाटे कमी, शेतकऱ्यांच्या रांगाअमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्रांवर कमी असणारे वजनकाटे व मंद गतीने खरेदी त्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर असणारी तुरीची आवक, यामुळे शेतकऱ्यांना आठ-आठ दिवस तुरीचे मोजमाप करण्यासाठी तिष्ठित रहावे लागते. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात नाफेडद्वारा १० शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलीत. मात्र गोदामांची व बारदाण्याची कमी असल्यामुळे आज तारखेत केवळ सातच केंद्रांवर तुरीची खरेदी होत आहे. खुल्या बाजारात चार हजार रुपये भाव आहे, तर शासकीय खरेदी केंद्रांवर हमी भाव म्हणजेच पाच हजार ५० रुपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गर्दी या खरेदी केंद्रांवर आहे. आज तारखेपर्यंत दीड लाख क्विंटल तुरीची खरेदी या केंद्रांवर करण्यात आली. मात्र नोडल एजन्सी असणाऱ्या नाफेडचे मुळात नियोजन नसल्यामुळे व शेतकऱ्यांची एवढी गर्दी होईल, अशी अपेक्षा नसल्याने पूर्णत: नियोजन कोलमडले आहे. विशेष म्हणजे ज्या बाजार समितींच्या मार्केट यार्डमध्ये ही शासकीय तूर खरेदी होत आहे तेथे शेतकऱ्यांना सुविधांचा अभाव आहे. नाफेडने मात्र या विषयी हात वर केले आहे. त्यांच्यामते शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्यावरही जबाबदारी आमची मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या बाजार समितीने पुरवायला हव्यात. मुळात नाफेडची यंत्रणादेखील तूर खरेदी करण्यास कमी पडत आहे. यंदा तुरीच्या उत्पादन वाढीमुळे व बाजारपेठेत हमीपेक्षा कमी भाव असल्यामुळे आर्थिक कोंडीत असलेला शेतकरी शेतमालास किमान हमीभाव तरी मिळेल या अपेक्षेत या शासकीय तूर खरेदी केंद्रावर तूर विकावयास आणीत आहे. येथे आवक अधिक व साठवण क्षमता कमी यामुळे शेतकऱ्यांची दैना होत आहे. दिवसभऱ्यात हजार ते बारासे क्विंटल तुरीचे मोजमाप करण्यात येते. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी बाजार समितीने टोकन देणे प्रारंभ केले. यामध्ये कित्येक दिवसांचे टोकन शेतकऱ्यांनी घेतले यातही शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत व्यापाऱ्यांनाच झुकतेमाप दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)अधिकची उकळली जाते हमाली बाजार समितीत नियमाप्रमाणे ३० रुपये हमालीचे दर असताना शेतकऱ्यांकडून यापेक्षा जास्त व अधिकतम १०० रुपयांपर्यंत घेतल्याची उदाहरणे आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकारदेखील या शासकीय तूर खरेदी केंद्रांवर घडत आहेत. शेतकऱ्यांचा याठिकाणी कोणी वाली नाही. केवळ लूट करायला सर्वजन टपले असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. चाळण्यासाठी मोजमापाचा वेग मंदावलाशेतमाल हा चाळणी करुन नाफेडद्वारा खरेदी केला जातो. मात्र शासकीय खरेदी केंद्रांवर चाळण्याची संख्या देखील कमी असल्याने तुरीच्या मोजमापास विलंब होतो. मुळात नाफेडजवळ गोदाम व बारदान्यांचा अभाव असल्यानेच अधिकाऱ्यांद्वारा वेळकाढू धोरणाचा अवलंब केला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बाजारातील तुरीचा माल येतोय नाफेड केंद्रांवर खुल्या बाजारात सध्या तुरीचे भाव सध्या कमालीचे कोसळले आहे. त्यामुळे अनेक व्यापारी हे खुल्या बाजारातून तुरीची खरेदी करुन शासकीय खरेदी केंद्रांवर विकत आहे. हा गोरखधंदा माहीत असूनही नाफेडचे अधिकारी व बाजार समित्यांचे पदाधिकारी यासाठी कुठेही अटकाव करीत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हाधिकारी देणार का लक्ष ? शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची खुलेआम लूट होत असल्याने सर्वच विभागाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारातदेखील गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी मागणी किंबहुना अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनान्वये तालुक्याच्या ठिकाणीच असणाऱ्या या केंद्रांवर नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत तुरीचे मोजमापे व सर्व व्यवहार होत आहेत.
तूर मोजणीसाठी आठवडाभर प्रतीक्षा
By admin | Published: March 09, 2017 12:18 AM